...

उपाययोजना कुचकामी? महामार्गावरील अपघातांसाठी जबाबदार कोण – रोहन सुरवसे पाटील यांचा सवाल

पुणे : मुंबई–बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील गंभीर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नाही. गुरुवारी झालेल्या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राबवलेल्या उपाययोजनांचा प्रभाव कितपत आहे, यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही अपघात रोखण्यात यंत्रणा अयशस्वी ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे. महामार्गावरील वाढत्या दुर्घटनांसाठी जबाबदार कोण, आणि उपाययोजना फसत का आहेत, याची चौकशी केंद्र सरकारने तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

 

 

पाटील यांनी सांगितले की, नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या धोकादायक पट्ट्यात अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा ताशी ६० वरून ४० किमीपर्यंत कमी करण्यात आली. तसेच वाहतूक तपासणी चौक्या, मनुष्यबळ तैनाती, गस्त वाहने आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता या चौक्यांवर मनुष्यबळाचा अभाव, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि महामार्गावर कोणतीही शिस्तबद्ध देखरेख नसल्याचे उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

NHAI कडून उपाययोजनांनंतर अपघातांची संख्या ६४ टक्क्यांनी घटली असल्याचा दावा करण्यात आला होता; परंतु गुरुवारी झालेली दुर्घटना या दाव्यांना छेद देणारी असल्याचे पाटील म्हणाले. महामार्गावरील निष्काळजीपणा, अपुरे पथ सुरक्षा उपाय आणि ढिसाळ अंमलबजावणीमुळे नागरिकांचे प्राण धोक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. पाटील यांनी केंद्र सरकारकडून या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करत, महामार्गावरील सुरक्षा उपाय प्रभावीपणे राबवणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

 

 

 

Local ad 1