महागडा iPhone सापडूनही मोह झाला नाही; पुण्यातील सुरक्षा रक्षकाची चर्चा रंगली

 

पुणे : खडकवासला धरण परिसरात कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांनी पुन्हा एकदा प्रामाणिकतेचे उदाहरण घालून दिले आहे. चौपाटी परिसरात विसरलेला सुमारे 1 लाख रुपये किमतीचा एप्पल आयफोन त्यांनी संबंधित विद्यार्थ्याला सुखरूप परत केला. (khadakwasla security guard returned iphone pune)

 

 

Maharashtra Rain Update : शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी !

 

 

माहितीनुसार, खडकवासला धरण येथील चौपाटी परिसरात एका कॉलेज विद्यार्थ्याने विश्रांती घेताना मोबाईल बाजूला ठेवला होता. मोबाईल गरम होत असल्याने त्याने तो वडाच्या झाडाजवळील भिंतीवर ठेवला. मात्र, काही वेळानंतर तो तेथून निघून गेला आणि मोबाईल विसरून राहिला.

 

दरम्यान, परिसराची नियमित पाहणी करत असताना सुरक्षा रक्षक हरिदास वऱ्हाड यांच्या नजरेस हा मोबाईल पडला. त्यांनी तत्काळ मोबाईल सुरक्षित ताब्यात घेतला. काही वेळानंतर त्या मोबाईलवर कॉल आल्यानंतर हरिदास वऱ्हाड यांनी संबंधित विद्यार्थ्याशी संपर्क साधला आणि मोबाईल सुरक्षित असल्याची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थी घटनास्थळी आल्यानंतर त्याला त्याचा मोबाईल परत करण्यात आला.

 

NEET paper leak Pune। नीट पेपरफुटीचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; ब्युटी पार्लर चालक महिला सीबीआयच्या ताब्यात

 

 

महागडा मोबाईल परत मिळाल्यानंतर विद्यार्थ्याने हरिदास वऱ्हाड यांचे आभार मानले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षा रक्षकांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. हरिदास वऱ्हाड यांना स्थानिक नागरिक “बहादूर सुरक्षा रक्षक” म्हणून ओळखतात. यापूर्वीही त्यांनी हरवलेले मोबाईल, वाहनांच्या चाव्या, सोन्याच्या चैन यांसारख्या मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे मालकांना परत केल्या आहेत.

 

तसेच खडकवासला धरण परिसरात आत्महत्येच्या उद्देशाने आलेल्या अनेकांचे प्राण वाचवण्याचे धाडसी कार्यही त्यांनी केले आहे. हरवलेल्या एका अल्पवयीन मुलीला सुरक्षितपणे कुटुंबाकडे पोहोचवण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले आहे. तसेच विविध संस्थांकडून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.हरिदास वऱ्हाड यांचे प्रामाणिकपणा, धाडस आणि सामाजिक जबाबदारीचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 

 

 

 

Local ad 1