पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेचा थेट परिणाम भारतातील इंधनदरांवर दिसून येत आहे. त्यामुळे इंधन दरवाढ होईल, अशी चर्चा सुरु होती. आता ती शक्यता खरी ठरली आहे. आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चात आणखी वाढ होणार आहे. (petrol diesel price hike new rates maharashtra may 2026)
नवीन दरांनुसार पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 3.16 इतकी वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात 3.10 प्रति लिटर वाढ झाली आहे. तसेच इंडियन ऑइलचे प्रीमियम इंधन XP95 च्या दरातही 3.14 प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशन अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली.
Maharashtra Rain Update : शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी !
इंधनाचे नवे दर आजपासून लागू
पेट्रोल : ₹103.82 + ₹3.16 = ₹106.98/L
डिझेल : ₹90.35 + ₹3.10 = ₹93.45/L
XP95 : ₹112.85 + ₹3.14 = ₹115.99/L
मध्य पूर्वेतील वाढता संघर्ष, काही देशांमधील युद्धजन्य हालचाली आणि जागतिक पुरवठा साखळीवर पडलेला परिणाम यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी चढ-उतार सुरू आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि जागतिक आर्थिक संकटाच्या छायेमुळे आयात खर्च वाढला आहे. परिणामी तेल कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, बांधकाम साहित्य आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवर होऊ शकतो. महागाईचा आणखी एक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देण्यासाठी करसवलत किंवा इतर उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी विविध ग्राहक संघटनांकडून करण्यात येत आहे.

