सचिन सानप यांच्या प्रचारासाठी शिवसेना मैदानात ; पुणे शहरात नियोजनाला वेग

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचारासाठी शिवसेनेने पुणे शहरात संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पुणे शहरातील प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी प्रचाराचे नियोजन आणि संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला.

 

 

MH Times Special Story। गुलाबाच्या फुलांपासून चक्क वाइन ! मायलेकींचा १२ वर्षांचा संघर्ष, अखेर स्वप्न साकार

 

 

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांच्या विजयासाठी संपूर्ण संघटनेने एकजुटीने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. ‘शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच हवा’ ही शिवसेनेची भूमिका असल्याचे सांगत, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवाराला संधी मिळावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.

 

शिक्षकांच्या सेवाविषयक समस्या, प्रलंबित प्रश्न आणि न्याय्य हक्कांसाठी विधान परिषदेत प्रभावीपणे आवाज उठवणारा प्रतिनिधी आवश्यक आहे. सचिन सानप यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर काम केले असून, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व विधान परिषदेत पोहोचावे, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

 

प्रचाराच्या पुढील टप्प्यात प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षक मतदारांशी संपर्क साधावा, सानप यांच्या कामाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा, यावर भर देण्यात आला. शिवसेनेची संघटनात्मक ताकद वापरून नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करण्याचे निश्चित करण्यात आले.

 

या बैठकीला उमेदवार सचिन सानप, युवासेना सचिव किरण साळी, अमर घुले, युवासेना महानगरप्रमुख हेमंत बागुल, राजेश पळसकर, संदीप लोणकर, लोकसभा युवासेना संपर्कप्रमुख अविनाश खेडेकर, श्रुती नाझिरकर, उपशहरप्रमुख दत्ता खवळे, आनंद गोयल, सुनील जाधव, दीपक कुलाळ, अक्षय तारू, पंकज कोद्रे आणि सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Local ad 1