...

रात्री अंधारात एकटी उभी असलेली मुलगी; खडकवासला धरणातील सुरक्षा रक्षकाने दाखवली माणुसकी

पुणे, ता. १४ : खडकवासला धरण परिसरात रात्री एकटी सोडलेल्या अल्पवयीन मुलीला सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे वेळेवर मदत मिळाली. पोलिसांच्या मदतीने त्या मुलीला सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १२) रात्री सुमारे नऊच्या सुमारास १५ ते १६ वर्षांची एक मुलगी मित्रासोबत धरण परिसरात आली होती. काही वेळाने त्या मुलाने “दोन मिनिटे थांब, मी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो” असे सांगत तेथून निघून गेला. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत आला नाही. त्यामुळे ती मुलगी धरणाजवळील झाडाखाली अंधारात एकटीच उभी होती.

या वेळी तेथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तत्काळ त्या मुलीकडे जाऊन विचारपूस केली. चौकशीदरम्यान ती एका मुलासोबत येथे आल्याचे तिने सांगितले. वऱ्हाड यांनी त्या मुलाचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. तसेच त्या मुलीकडे स्वतःचा मोबाईलही नव्हता.

 

परिस्थितीची गंभीरता ओळखून वऱ्हाड यांनी तिला सुरक्षितपणे घरी जाण्यासाठी ऑटो-रिक्शाची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शवली. मात्र कौटुंबिक कारणांमुळे तिने घरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर वऱ्हाड यांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

 

काही वेळातच स्थानिक पोलीस कर्मचारी दीपक सपकाळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित मुलीची समजूत काढत तिला सुरक्षितपणे नांदेड सिटी परिसरातील तिच्या घरी पोहोचवले.

 

दरम्यान, सुरक्षा रक्षक हरिदास वऱ्हाड यांनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह अनेकांना मदत करून जीव वाचवले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल Rotary Club of Sinhagad Road यांच्या वतीने इतिहास संशोधक Pandurang Balkawade यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

 

 

Local ad 1