Maharashtra Rain Update : शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी !

मान्सूनच्या आगमनाचा अंदाज जाहीर

Maharashtra Rain Update पुणे : यंदाच्या मान्सून बाबत चिंतेचे वातावरण असताना नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी (13 मे) जाहीर केलेल्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सून 16 मेपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात तसेच अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

 

यापूर्वी हवामान विभागाने यंदा देशात सरासरीच्या 96 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पावसाळ्यात काही कालावधीत मोठा खंड पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

यंदा ‘अल निनो’चा प्रभाव कमी झाल्यामुळे मान्सूनची वाटचाल तुलनेने अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. सध्या अंदमान समुद्र परिसरात मान्सूनची हालचाल सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत त्याच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक बनत आहे.

 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 3 ते 5 जून दरम्यान केरळमध्ये, 7 ते 9 जून दरम्यान तळकोकणात, तर 12 ते 14 जूनदरम्यान मुंबई आणि पुणे शहरात दाखल होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.

 

दरम्यान, मान्सूनपूर्व काळात उष्णतेचा त्रास कायम राहणार असून, पुढील 4 ते 5 दिवसांत पूर्व राजस्थान, मध्य भारत, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागांत उष्णतेची लाट सक्रिय राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी, पावसातील संभाव्य खंड लक्षात घेऊन जलसंधारण आणि पाणी बचतीवर भर देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Local ad 1