सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुले, मनोरुग्णांसोबत स्नेहभोजन

रोहन सुरवसे पाटील यांच्याकडून फळवाटप; आश्रमाला आर्थिक मदत

 

पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विक्रम काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांच्या वतीने उंड्री येथील ‘आसरा – अनाथांचा हक्काचा निवारा’ या संस्थेत स्नेहभोजन आणि फळवाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या आश्रमात राहणाऱ्या अनाथ मुलांसह मनोरुग्ण व्यक्तींना स्नेहभोजन देऊन त्यांच्यासोबत वेळ घालविण्यात आला. तसेच संस्थेच्या कार्याला हातभार लावण्यासाठी आर्थिक मदतही देण्यात आली. (sunetra pawar birthday)

 

वाढदिवसाचे औचित्य साधून रोहन सुरवसे पाटील यांनी आश्रमातील मुलांशी आणि मनोरुग्ण व्यक्तींशी संवाद साधला. त्यांच्या गरजा आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी सर्वांना गोडधोड भोजन देण्यात आले, तसेच फळांचे वाटप करण्यात आले. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर प्रेम, आपुलकी आणि भावनिक आधार देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

आश्रमातील अनाथ मुलांचे शिक्षण, संगोपन आणि मनोरुग्ण व्यक्तींची देखभाल यांसाठी संस्थेच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहितीही सुरवसे पाटील यांनी घेतली. संस्थेच्या संचालिका स्वाती डिंगळे यांनी आश्रमाच्या कामकाजाची माहिती देताना मुलांचा दैनंदिन दिनक्रम, शिक्षण, संगोपन तसेच मनोरुग्ण व्यक्तींची काळजी घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी सांगितले.

या प्रसंगी विशाल विहिरे, रणजित शिंपले आणि प्रसाद पाटील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील मुलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

‘अनाथ मुलांना आणि मनोरुग्ण व्यक्तींना आर्थिक मदतीसोबतच प्रेम, आपुलकी आणि भावनिक आधाराचीही गरज असते. समाजातील प्रत्येक घटकाने अशा व्यक्तींच्या पाठीशी उभे राहून त्यांना आधार देणे आवश्यक आहे. या मुलांच्या आणि गरजू व्यक्तींच्या पाठीशी आम्ही कायम उभे राहू,’ असा विश्वास रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केला.

वाढदिवसासारख्या प्रसंगांचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबविणे आणि गरजू घटकांशी आपुलकीचे नाते निर्माण करणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

 

 

 

Local ad 1