गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरी ; दरोड्याच्या तयारीतील ११ जणांना अटक
६३ महागडे मोबाइल, कार, चाकू-कटर आणि मिरची पावडर असा ३०.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या खिशातील मोबाइल चोरणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या ११ जणांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून विविध कंपन्यांचे तब्बल ६३ महागडे मोबाइल फोन, शेवरलेट कंपनीची कार (एमएच ४३ एबी १९९०), चाकू, कटर, मिरची पावडर असा एकूण ३० लाख ५७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Ganesh Visarjan Mobile Theft Pune Shivajinagar Police 11 Arrested)
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, झाशीची राणी चौक, पुणे महापालिका परिसर आणि लक्ष्मी रोड परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांचे निगराणी पथक गस्त घालत होते.
राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुके कोणते? नांदेडच्या १४ तालुक्यांचाच समावेश; संपूर्ण यादी पाहा
दरम्यान, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खुडे ब्रिज परिसरातील नदीपात्रालगत काही जण हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे आणि पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली.
पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून अब्दुल कादीर नुर मोहम्मद (२८), अब्दुल मलीक अब्दुल खालीक (२२), जीयाऊ रहेमान शौकत हुसेन (२६), मोहम्मद अस्यद मोहम्मद अजमल (३१), फैसल अजीज खान (२४), अंजुम मोहम्मद साजिद अन्सारी (३०), जुबेर अहमद मुख्तार अहमद (३५), अकार अहमद अल्लाफ अहमद अन्सारी (३०), नावेद अख्तर शफीक अहमद अन्सारी (३३), अतहर अहमद एजाज अहमद (२३) आणि अतुल नारायण इंगळे (२४) यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून ६३ मोबाइल फोनसह शेवरलेट कार, सु-या, कटर आणि लाल मिरची पावडर जप्त करण्यात आली. आरोपींपैकी काही जणांविरुद्ध नाशिक शहर तसेच नाशिक ग्रामीण भागात शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करीत आहेत.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ तसेच सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिधावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मनिषा वालसे आणि त्यांच्या पथकाने केली. पोलीस उपनिरीक्षक मनिषा वलसे, सपोफौ प्रदीप खळदकर, पोलीस हवालदार गणेश चोबे, तेजस चौपडे आदींचा पथकात समावेश होता.

