पुणे महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

हॉस्पिटलवरील कारवाई टाळण्यासाठी २० लाखांची मागणी

 

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील वर्ग-२ वैद्यकीय अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०, रा. शुभ गेटवे, विमाननगर, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. हॉस्पिटलमधील त्रुटींवर कारवाई न करण्यासाठी तसेच वरिष्ठांकडे कमी स्वरूपाची कारवाई करण्याचा अहवाल पाठविण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

 

गणेश विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरी ; दरोड्याच्या तयारीतील ११ जणांना अटक

 

 

तक्रारदार हे वैद्यकीय व्यावसायिक असून त्यांच्या हॉस्पिटलमधील कामकाजात अनियमितता असल्याबाबतचा तक्रार अर्ज पुणे महापालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात प्राप्त झाला होता. या अर्जाची चौकशी डॉ. चकोर यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

१८ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. चकोर यांनी तक्रारदारांच्या हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी हॉस्पिटलमधील त्रुटींचे निराकरण करावे लागेल, अन्यथा हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. कारवाईचा अहवाल टाळण्यासाठी सुरुवातीला २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्यात आले आणि उर्वरित रकमेबाबत नंतर सांगण्यात येईल, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदारांनी २१ सप्टेंबर रोजी पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली.

 

राज्यातील २६५ दुष्काळग्रस्त तालुके कोणते? नांदेडच्या १४ तालुक्यांचाच समावेश; संपूर्ण यादी पाहा

 

 

पडताळणीत लाचेची मागणी स्पष्ट

तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने २४ सप्टेंबर रोजी धानोरी येथील भैरवनाथ नगर परिसरात पडताळणी केली. या पडताळणीत डॉ. चकोर यांनी हॉस्पिटलमधील त्रुटी दाखवून वरिष्ठांकडून कमीत कमी कारवाई, म्हणजे नोटीस देण्यासाठी स्वतःसाठी आणि ‘साहेबांसाठी’ ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच यापूर्वी १५ हजार रुपये घेतल्याचेही तपासात समोर आले.

 

हॉस्पिटलच्या केबिनमध्ये सापळा

पडताळणीच्या आधारे २६ सप्टेंबर रोजी धानोरी येथील संबंधित हॉस्पिटलच्या केबिनमध्ये एसीबीने सापळा रचला. या कारवाईदरम्यान डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई एसीबी पुणेचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक निता मिसाळ, पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके तसेच पोलीस अंमलदार प्रवीण तावरे, वनिता गोरे, आश्विन कुमकर आणि चंद्रकांत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

लाच मागितल्यास एसीबीशी संपर्काचे आवाहन

कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास किंवा भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एसीबी संपर्क : (०२०) २६१३२८०२, (०२०) २६१२२१३४
टोल फ्री : १०६४

Local ad 1