पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन; रवींद्र चव्हाण पश्चिम महाराष्ट्रात ठाण मांडून

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये संघटनात्मक बैठकांचा धडाका; स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी मोर्चेबांधणी

 

पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराची रणनीती आखण्यासह संघटनात्मक हालचालींना वेग दिला आहे. महायुतीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठाण मांडले आहे. पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांद्वारे निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे.

 

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मंडल व जिल्हास्तरावर बैठका घेऊन चव्हाण यांनी पक्षाच्या संघटनात्मक तयारीला गती दिली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.

 

PMC Property Tax : चेक बाऊन्स झाल्यास ५ हजारांचा भुर्दंड?

 

 

बूथनिहाय नियोजनावर भर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी प्रभावी संपर्क, बूथनिहाय नियोजन, स्थानिक पातळीवरील समन्वय आणि पक्षसंघटनेच्या माध्यमातून प्रचाराचा विस्तार या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. शिक्षक आणि पदवीधर मतदारांपर्यंत राज्य सरकारच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती पोहोचविण्यावरही भर देण्यात येत आहे.

 

या निवडणुकीत भाजप आणि महायुतीसमोर उमेदवारांच्या विजयासोबतच संघटनात्मक ताकद सिद्ध करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे, मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवावा आणि प्रचारात समन्वय राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हास्तरीय पदाधिकारीही निवडणुकीच्या नियोजनात सहभागी होत आहेत. मतदार नोंदणीपासून ते प्रत्यक्ष प्रचारापर्यंत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली जात आहे.

 

शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना व्यासपीठ देण्याची संधी : राजेश पांडे

भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले, “पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही केवळ राजकीय लढत नसून शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याची संधी आहे. मतदार नोंदणीपासून ते मतदारांशी थेट संवाद साधण्यापर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समन्वयातून भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत.”

 

 

Local ad 1