पुणे, दि. १७ : घरगुती वादातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचे प्राण खडकवासला धरणावर तैनात असलेल्या बहादूर सुरक्षा रक्षकाने वाचवले. क्षणाचाही विलंब न करता धरणात उडी घेत हरिदास पुंडलिक वऱ्हाड यांनी महिलेला पाण्यातून बाहेर काढत तिचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. (bahadur suraksha rakshak khadakwasla dam woman life saved)
घोरपडी परिसरात राहणारी सुमारे ३५ वर्षांची ही महिला गुरुवारी (ता. १५) दुपारी साडेतीनच्या सुमारास खडकवासला धरण परिसरात आली होती. काही वेळातच ती पुढे-पुढे खोल पाण्यात जात बुडू लागली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पर्यटक उपस्थित असतानाही कोणीही तिला वाचवण्यासाठी पुढे सरसावले नाही.
दरम्यान, धरणाच्या निगराणीवर असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने हरिदास वऱ्हाड यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यावेळी हरिदास हे घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर होते. माहिती मिळताच त्यांनी धावत येत थेट पाण्यात उडी घेतली आणि वेगाने महिलेपर्यंत पोहोचले.
महिला प्रतिकार करत असतानाही हरिदास यांनी धैर्याने तिला पकडून किनाऱ्याकडे खेचले. यावेळी इतर सुरक्षा रक्षक योगेश गोपाळ आणि योगेश राठोड यांनी मदत करत महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हरिदास वऱ्हाड हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील चोंडी भैरोबा गावचे रहिवासी असून सध्या नऱ्हे येथे वास्तव्यास आहेत. पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत गेल्या वर्षभरापासून ते खडकवासला धरण येथे कार्यरत आहेत. याआधीही त्यांनी पाच ते सहा जणांचे प्राण वाचवले असून, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
“माझ्यासमोर कोणाचा जीव जाताना मी पाहू शकत नाही. ज्या नोकरीमुळे माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, त्या कामाला प्राधान्य देत जीवाची पर्वा न करता मी ही महिला वाचवली. याचे मला समाधान आहे.” — हरिदास पुंडलिक वऱ्हाड, सुरक्षा रक्षक, खडकवासला धरण

