पुणे : खडकवासला धरण परिसरात अनेक नागरिकांचे प्राण वाचवून मानवतेचा आदर्श निर्माण करणारे सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांचा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. खडकवासला धरण कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात माजी महापौर तथा माजी आमदार दीप्ती चवधरी चौधरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या धाडसी आणि निःस्वार्थ सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला. यानंतर जलपूजनाचाही कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लघुअण्णा निवांगुणे, खडकवासला मतदारसंघ काँग्रेस अध्यक्ष व ज्येष्ठ नेते सुरेश मते, माजी सरपंच प्रशांत नानगुडे पाटील, काँग्रेस नेते अवधूत दादा मते, मुकाई उद्योग समूहाचे उद्योजक संदीप मते तसेच माजी सैनिक सिताराम मते यांची प्रमुख उपस्थिती होती.
हरिदास वऱ्हाड यांनी खडकवासला धरण परिसरात अनेक वेळा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता खोल पाण्यात उडी घेणाऱ्या नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. आत्महत्येच्या उद्देशाने आलेल्या अनेक व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्याबरोबरच त्यांचे समुपदेशन करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त केले आहे.
याशिवाय रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती तसेच गड-किल्ल्यांवरील बचाव मोहिमांमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अडचणीत सापडलेल्या नागरिकांना वेळेवर मदत करून अनेकांचे जीव वाचवले असून रात्रीच्या वेळी अडकलेल्या तरुणींना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याचेही कार्य त्यांनी केले आहे.
यावेळी दीप्तीताई चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “समाजासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे. हरिदास वऱ्हाड यांचे कार्य प्रेरणादायी असून युवकांनी त्यांच्याकडून सेवा, धैर्य आणि मानवतेचे मूल्य आत्मसात करावे. प्रत्येकाने आपल्या परीने समाजासाठी योगदान दिल्यास सकारात्मक परिवर्तन घडू शकते.”
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रदान करण्यात आलेल्या अभिनंदनपत्रातही हरिदास वऱ्हाड यांच्या धाडसी, मानवतावादी आणि सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. विविध सामाजिक संस्था, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील मान्यवर तसेच राजकीय नेते त्यांच्या कार्याची सातत्याने दखल घेत असून त्यांच्या सेवेला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना नवजीवन मिळाले असून समाजात मानवता, धैर्य आणि सेवाभावाचा सकारात्मक संदेश पोहोचत आहे.

