पुणे : BBSM क्रिकेट स्पर्धा २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या क्रीडामहोत्सवात तब्बल ४४८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, त्यामध्ये १५२ पुरुष संघ आणि ६४ महिला संघ सहभागी झाले आहेत. (bbsm cricket spardha 2026 baner balewadi udghatan)
बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील एकूण २१६ सोसायट्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर क्रीडासंस्कृतीला चालना मिळत असून, सोसायटी स्तरावर क्रीडा स्पर्धांचे हे एक मोठे व्यासपीठ ठरत आहे. खेळाडूंचा उत्साह, संघभावना आणि क्रीडाशिस्त यामुळे उद्घाटन सोहळ्याला विशेष रंगत आली.
उद्घाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, सरला चांदेरे, वैशाली कमाजदार, माजी सरपंच जंगल रणवरे, निलेश पाडाळे, नासिर सय्यद, अर्जुन शिंदे, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, संजय ताम्हाणे, सुधाकर धनकुडे, अर्जुन ननावरे, गणेश सुतार, शेखर सायकर तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबुराव चांदेरे म्हणाले की, “ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून समाजातील युवक-युवतींना एकत्र आणणारा, आरोग्यदायी स्पर्धेला चालना देणारा आणि संघभावना वृद्धिंगत करणारा प्रेरणादायी उपक्रम आहे.” तसेच, स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर चांदेरे व आयोजन समितीच्या सर्व सदस्यांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी कौतुक केले. BBSM क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दि. १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

