...

सुस-नांदे आरपी रोडच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी

 

पुणे, सुस-नांदे आरपी रोडवरील सनीज वर्ल्ड परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या महत्त्वाच्या कामाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच दौरा करून प्रत्यक्ष आढावा घेतला. या कामांमुळे परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार असून, प्रवासातील सुरक्षितता वाढवण्यावर पवारांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

 

या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार शंकर मांडेकर यांच्या शुभहस्ते झाला होता. त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्यासह भेट दिली. यावेळी त्यांनी कामाचे नियोजन, साईट मोजमाप, वाहतुकीची माहिती आणि कामाची गुणवत्ता या सर्व तांत्रिक बाबींचा सखोल आढावा घेतला.

 

 

या रस्त्यामुळे सुस आणि परिसरातील हजारो रहिवाशांना अधिक सुलभ आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. वाहतूक कोंडीचा दीर्घकाळचा त्रास कमी होणार असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवास, कार्यालयीन वाहतूक आणि व्यापारी दळणवळणाला मोठी गती मिळेल. या बदलांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ठेकेदार आणि प्रशासनाला स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यांनी वाहतुकीतील असुरक्षितता आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणत्या तांत्रिक आणि प्रत्यक्ष उपाययोजना करायच्या, याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

 

पवारांनी वाहतुकीच्या दृष्टीने संपूर्ण परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. यामध्ये वाहतूक कोंडीचे पॉईंट्स, रस्त्यावरील उतार-चढाव, वळणांवरील धोक्याचे संभाव्य क्षेत्र आणि भविष्यातील लोकसंख्या वाढ व वाहन प्रवाहाचाही त्यांनी तपशीलवार माहिती घेतली.

 

 

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार शंकर मांडेकर, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, शिवाजीराव काळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे, नामदेवराव चांदेरे व असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी यावेळी बोलताना सांगितले, “या रस्त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि सुरक्षितता वाढेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व हे कामाचा दर्जा, निर्णय क्षमता आणि विकासासाठीची बांधिलकी याचे उत्तम उदाहरण आहे.” त्यांनी या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचेही आभार मानले.

 

 

 

 

 

 

Local ad 1