Bajaj Finserv Pune HQ बजाज फिनसर्व्हच्या नव्या मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Bajaj Finserv Pune HQ पुणे: बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्यात आयोजित बजाज फिनसर्व्हच्या ६ हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, बजाज फायनान्सचे उपाध्यक्ष राजीव जैन, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.

 

पुणे आणि मुंबई देशाची फिनटेक राजधानी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असून पुणे व मुंबई ही देशामधील फिनटेक इकोसिस्टीमची मुख्य केंद्र बनली आहेत. पहिल्या तिमाहीत एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी ६१ टक्के गुंतवणूक एकट्या मुंबईत झाली आहे. हीच फिनटेक इकोसिस्टीम आता नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही विस्तारली जात असून, लवकरच नागपूरमध्ये बजाज फिनसर्व्हची सेवा सुरू होईल.

 

पुण्यासाठी वेगवान वाहतूक आणि पायाभूत सुविधा

पुण्याचा वाढता वेग लक्षात घेता अंतर्गत व बाह्य रिंगरोडसह भुयारी मार्गांचे जाळे निर्माण केले जात आहे. पुढील ३ ते ४ वर्षांत पुण्याची ओळख ‘फास्ट मोबिलिटी सिटी’ म्हणून तयार केली जाईल. बजाज फिनसर्व्हच्या या नव्या परिसरात सुमारे ४० हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. हा परिसर जोडणारे रस्ते आणि अतिरिक्त पूल इमारतीचे काम पूर्ण होण्यापूर्वीच तयार केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच बजाज समूहाच्या सहकार्याने पुण्यात एक भव्य कला आणि सांस्कृतिक केंद्र उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, बजाज फिनसर्व्हचा राज्य शासनासोबत ६ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला आहे. आकुर्डी, चाकण आणि वाळूजच्या औद्योगिक विकासानंतर आता या नव्या अत्याधुनिक कॅम्पसमुळे पुण्यातील तरुणांसाठी एआय (AI), फिनटेक, डेटा ॲनालिटिक्स आणि डिजिटल वित्तीय सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होतील.

 

७.२ दशलक्ष चौ. फुटांचा पर्यावरणपूरक परिसर

प्रस्तावित मुख्यालयाबाबत माहिती देताना बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज यांनी सांगितले की, पुण्यात ७.२ दशलक्ष चौरस फुटांचा नवा परिसर विकसित केला जात आहे. हा संपूर्ण कॅम्पस कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), ऊर्जा व पाणी बचत आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रचनेवर आधारित असेल.
Local ad 1