Bajaj Pune Grand Tour 2026। जगातील नामवंत सायकलपटू मैदानात उतरले ! । फोटो फिचर
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघांत विजेतेपदासाठी चुरस
पुणे | दि. १९ : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची आज झालेली प्रोलॉग (टाइम ट्रायल) रेस ही आयोजनातील भव्यता, उत्कृष्ट नियोजन आणि जागतिक दर्जाची साक्ष देणारी ठरली. जगभरातील ३५ देशांतील २८ नामवंत संघांचे १६४ आंतरराष्ट्रीय सायकलपटू या स्पर्धेत सहभागी झाले असून, पुढील चार दिवसांत सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवरून सुमारे ४३७ किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास करत विजेतेपदासाठी लढत देणार आहेत. स्पर्धेचा उत्साहवर्धक पूर्वरंग असलेली ७.५ किलोमीटरची प्रोलॉग रेस दुपारी १.३० वाजता सुरू झाली. शहरातील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पहिल्या स्पर्धकाला हिरवा झेंडा दाखवत अधिकृत सुरुवात केली.
Bajaj Pune Grand Tour 2026 : पहिला टप्पा हिंजवडी ते आकुर्डी ९१.८ किमी सायकल शर्यत
यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राज्य क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. ही मास स्टार्ट रेस नसून, प्रत्येक सायकलपटूने एक मिनिटाच्या अंतराने वैयक्तिक वेळेवर शर्यत पूर्ण केली. पुणेकर नागरिकांनी शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवर उभे राहून सायकलपटूंना जल्लोषात प्रोत्साहन दिले.
स्पर्धेच्या पुढील टप्प्यांमध्ये आशिया खंडातील ७८, युरोपमधील ६९, तसेच ओशनिया, अमेरिका व आफ्रिका खंडांतील सायकलपटू सहभागी होत आहेत. भारताचा इंडियन डेव्हलपमेंट संघ देखील या प्रतिष्ठित स्पर्धेत उतरला असून, भारतीय सायकलिंगसाठी ही स्पर्धा मैलाचा दगड ठरणार आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
स्पर्धा मार्गावर सुमारे १,५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, विशेष शाखा, बॉम्ब नाशक पथक, शीघ्र कृती दल यांचा समावेश होता. वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियोजन, तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका व तांत्रिक सहाय्य पथके सज्ज ठेवण्यात आली होती. २० ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणारी बजाज पुणे ग्रँड टूर स्पर्धा पुणे व परिसराच्या क्रीडा, पर्यटन आणि जागतिक ओळखीला नवे परिमाण देणारी ठरणार आहे. आजचा प्रोलॉग हा केवळ पूर्वरंग असून, पुढील टप्प्यांमध्ये सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवर रंगणारी चुरस अधिक उत्कंठावर्धक ठरणार आहे.
ढोल-ताशांचा निनाद आणि शिवगर्जना
प्रोलॉगच्या शुभारंभावेळी गोपाळकृष्ण गोखले चौक ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेला. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी वातावरणात ऊर्जा संचारली. पुणेकरांनी पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे स्वागत केले.
स्पर्धेचा रंग वाढवणारा ‘मस्कॉट’
बजाज पुणे ग्रँड टूरचे मस्कॉट नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. महाराष्ट्राचे प्रतीक असलेला ‘शेकरू’ (इंदू) या माध्यमातून निसर्ग आणि खेळ यांचा संदेश जागतिक पातळीवर पोहोचवण्यात आला.
परंपरा आणि आधुनिकतेचा संगम
मराठमोळा पोशाख, भगवे फेटे आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल रेस— या अनोख्या संगमामुळे पुण्याची वेगळी ओळख अधोरेखित झाली.
❓ प्रश्न-उत्तर
प्र.1: बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ कधी आयोजित करण्यात आली आहे?
उ. ही स्पर्धा २० ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
प्र.2: प्रोलॉग रेसची लांबी किती होती?
उ. प्रोलॉग (टाइम ट्रायल) रेस ७.५ किलोमीटर अंतराची होती.
प्र.3: या स्पर्धेत किती देशांतील संघ सहभागी आहेत?
उ. ३५ देशांतील २८ आंतरराष्ट्रीय संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
प्र.4: भारतीय संघाचा सहभाग आहे का?
उ. होय, इंडियन डेव्हलपमेंट संघ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला आहे.
प्र.5: स्पर्धेचा एकूण मार्ग किती किलोमीटरचा आहे?
उ. ही स्पर्धा सुमारे ४३७ किलोमीटर अंतराची आहे.





