...

PMC Mayor Election । महापौराची निवड कशी होते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 

PMC Mayor Election । पुणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. आता पुणेकरांचे लक्ष महापौर नियुक्ती कडे लगाले. दरम्यान, महापौर व उपमहापौर निवडीसाठीची प्रक्रिया पुणे महापालिकेने अधिकृतपणे सुरू केली असून, निवडणुकीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आले होते. महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या या प्रक्रियेमुळे ६ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. मात्र, महापौर आणि उपमहापौरांची निवड नेमकी कशी होते, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

 

जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण कधी जाहीर झाले? तुमच्या जिल्हा परिषदेचे आरक्षण काय आहे ?

 

महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष भाजप ठरल्याने पुणे महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौरपदासाठी भाजपमधील इच्छुकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. महापौर निवडीच्या दिवशी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली विशेष सभा होणार असून, त्याच सभेत पुण्याला ५८ वे महापौर मिळणार आहेत. यंदा पुणे महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण (महिला) या प्रवर्गासाठी राखीव आहे.

 

 

व्हिडिओ : बहादूर सुरक्षा रक्षकाची उडी ; खडकवासला धरणात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचले

 

 

निवडणूक निकालानंतर सर्व राजकीय पक्षांकडून विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी केली जाते. त्यानंतर नगरसचिव कार्यालयाकडून महापौर व उपमहापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जातो. महापौर व उपमहापौरांची निवड झाल्यानंतर पुणे महापालिकेचे सभागृह अधिकृतपणे अस्तित्वात येते. महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनुसार ६ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

या दिवशी पुणे महानगरपालिकेच्या नवीन सभागृहाची पहिली विशेष सभा होणार असून, सकाळी ११ वाजता ही सभा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. महापौर व उपमहापौर निवडीचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल, असे महापालिकेच्या नगर सचिव योगिती भोसले यांनी दिली.

 

अशी होते महापौर निवड
महापालिकेने पाठविलेल्या पत्रानुसार विभागीय आयुक्त महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात. त्यानंतर विशेष सभेची तारीख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाते आणि अधिकृत नोटीस काढली जाते. या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज स्वीकारले जातात. निवडणुकीच्या दिवशी सभा सुरू झाल्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत दिली जाते. एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास पीठासीन अधिकारी मतदान प्रक्रिया राबवितात. मतदान पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवाराची अधिकृत घोषणा केली जाते.

❓ प्रश्न–उत्तर

प्रश्न 1 : पुणे महापालिकेचा महापौर कसा निवडला जातो?
👉 नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विशेष सभेत मतदानाद्वारे महापौराची निवड केली जाते.

प्रश्न 2 : महापौर निवडणुकीसाठी कोण पीठासीन अधिकारी नियुक्त करतो?
👉 विभागीय आयुक्त महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात.

प्रश्न 3 : यंदा पुणे महापालिकेचे महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे?
👉 यंदा महापौरपद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे.

प्रश्न 4 : पुणे महापालिकेची महापौर निवडणूक कधी होणार आहे?
👉 ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महापौर व उपमहापौरांची निवड होणार आहे.

प्रश्न 5 : एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास काय प्रक्रिया असते?
👉 अशा वेळी पीठासीन अधिकारी मतदान प्रक्रिया राबवतात आणि बहुमताने विजयी उमेदवार घोषित केला जातो.

Local ad 1