पुणे | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे शहराला नवा महापौर व उपमहापौर कधी मिळणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. महापौर पदासाठीचे आरक्षण गुरुवारी (ता. 22) निश्चित होणार असून, त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुण्याला नवा महापौर मिळण्याची शक्यता आहे. याच कालावधीत नवनिर्वाचित महापालिका सभागृहही अस्तित्वात येणार आहे. (pune new mayor)
महापालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावरच यश – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सुरू असलेली राजकीय हालचाल काहीशी स्थिरावली असली, तरी महापौर व उपमहापौर पदासाठी कोणाची निवड होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता कायम आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यापूर्वी 10 फेब्रुवारीपर्यंत नवे सभागृह अस्तित्वात येण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यामुळे 5 फेब्रुवारीपूर्वीच पुण्याला नवा महापौर मिळण्याची शक्यता आहे.
महापौर निवडीची प्रक्रिया कशी असते?
महापौर व उपमहापौर यांच्या निवडीनंतरच नवनिर्वाचित सभागृह अस्तित्वात येते. आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापालिकेकडून विभागीय आयुक्तांना निवड कार्यक्रम निश्चित करण्यासाठी पत्र पाठविले जाते. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होते. महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज मागविले जातात. अर्जांची छाननी करून सात दिवसांची नोटीस दिली जाते आणि त्यानंतर निवड प्रक्रिया पार पडते. महापौर निवड झाल्याच दिवशी महापालिकेची पहिली मुख्य सभा होते आणि तेव्हापासून नवे सभागृह पुढील पाच वर्षांसाठी कार्यरत होते.
राज्य सरकारकडूनच कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
यंदा पहिल्यांदाच राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडल्या आहेत. सर्व महापालिकांची सभागृहे एकाच दिवशी अस्तित्वात आल्यास पुढील पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुलभ होणार आहे. त्यामुळे महापौर निवडीचा कार्यक्रम राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडूनच जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
❓ प्रश्न-उत्तर
प्रश्न 1 : पुण्याला नवा महापौर कधी मिळणार?
उत्तर : महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुण्याला नवा महापौर मिळण्याची शक्यता आहे.
प्रश्न 2 : महापौर पदाचे आरक्षण कधी जाहीर होणार?
उत्तर : गुरुवारी, 22 जानेवारी रोजी महापौर पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे.
प्रश्न 3 : नवनिर्वाचित महापालिका सभागृह कधी अस्तित्वात येईल?
उत्तर : महापौर व उपमहापौर निवड झाल्यानंतर त्याच दिवशी नवनिर्वाचित सभागृह अस्तित्वात येते.
प्रश्न 4 : महापौर निवडीचा कार्यक्रम कोण ठरवतो?
उत्तर : विभागीय आयुक्त किंवा राज्य सरकारचा नगरविकास विभाग महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करू शकतो.

