पुणे मनपात ‘भूमिग्रीन’चाच बोलबाला? घनकचरा विभागाचे नाव बदलण्याचा उपरोधिक प्रस्ताव

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागावर ‘भूमिग्रीन’ कंपनीला झुकते माप दिले जात असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी प्रशासनावर उपरोधिक पद्धतीने जोरदार टीका केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नाव बदलून ‘पुणे मनपा भूमिग्रीन घनकचरा व्यवस्थापन विभाग’ असे करण्यात यावे, असा उपरोधिक प्रस्ताव सदस्य रफिक शेख यांनी मांडला असून त्याला नगरसेविका दीपाली डोख यांनी अनुमोदन दिले आहे.

 

या प्रस्तावात घनकचरा व्यवस्थापन विभागातील अभियंते, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, दक्षता विभाग आणि आयुक्त कार्यालय हे सर्वच भूमिग्रीन कंपनीच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कंपनीच्या हितासाठी प्रशासनातील काही घटक झटत असून, कोट्यवधी रुपयांच्या निविदा भूमिग्रीनला मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावाही प्रस्तावात करण्यात आला आहे.

 

प्रस्तावातील भाषाशैली अत्यंत उपरोधिक असून, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि भूमिग्रीन हे ‘एकाच नाण्याच्या दोन बाजू’ असल्याची भावना प्रशासनाच्या कार्यपद्धतीतून निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, घनकचऱ्याऐवजी ‘धनकचरा’ असा उल्लेखही आता सहजपणे केला जात असल्याची टीकाही करण्यात आली आहे. भूमिग्रीन कंपनीचा उल्लेख होताच प्रशासनात निर्माण होणारा उत्साह पाहता, विभागाचे नावच कंपनीच्या नावाशी जोडण्यात यावे, अशी उपरोधिक मागणी प्रस्तावातून करण्यात आली आहे.

 

दरम्यान, महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या निविदांवरून गेल्या काही दिवसांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू आहे. यापूर्वीही स्थायी समितीच्या बैठकीत भूमिग्रीन कंपनीला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. आता विभागाचे नाव बदलण्याचा उपरोधिक प्रस्ताव मांडल्याने हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

 

 

Local ad 1