पुणे, आळंदी–मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाच्या रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने पहाटे धडक कारवाई करत मोठा छापा टाकला. या कारवाईत १०७ तरुण आणि ४९ तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, पार्टीमध्ये गांजा आणि बंदी असलेल्या हुक्का फ्लेवर्सचा वापर झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी सुमारे ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (tulapur rave party project x pune crime branch raid)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लेज एंटरटेनमेंटचे ऐमन शेख आणि स्टार लाईट एंटरटेनमेंटचा यश चौधरी यांनी तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात ‘प्रोजेक्ट एक्स’ या नावाने रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. या ठिकाणी अंमली पदार्थांचा वापर होत असल्याची गोपनीय माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखेचे १५ अधिकारी आणि ६५ पोलीस अंमलदार यांच्या पथकाने शनिवारी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास बंगल्यावर छापा टाकला. कारवाईदरम्यान पार्टीमध्ये १०७ तरुण आणि ४९ तरुणी उपस्थित असल्याचे आढळून आले. यामध्ये तिघे जण २१ वर्षांखालील असल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
देवस्थान जमिनींबाबत सरकारचा मोठा निर्णय ; नव्याने होणार कायदा
झडतीदरम्यान पोलिसांना ३ ग्रॅम गांजा तसेच बंदी असलेल्या हुक्का फ्लेवर्सच्या तीन कप पॉट्स आढळून आल्या. याशिवाय पार्टीस्थळी सुमारे ९ लाख २२ हजार रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले. मद्य वितरणासाठी रात्री साडेअकरा वाजेपर्यंतच परवानगी असतानाही पार्टी सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई रविवारी सकाळपर्यंत सुरू होती. पोलिसांनी ध्वनी व्यवस्था, मद्यसाठा, हुक्का साहित्य आणि इतर साहित्यांसह एकूण सुमारे ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आयोजकांसह संबंधितांविरोधात अंमली पदार्थ, मद्यविक्री आणि इतर कायद्यांअंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

