...

पुण्यात बनावट देशी व डिफेन्स ओन्ली मद्यावर छापा | 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, पुणे जिल्ह्यात बनावट देशी दारू तसेच ‘फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओन्ली’ म्हणून विक्रीस मनाई असलेल्या विदेशी मद्याच्या अवैध साठा व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाने दोन स्वतंत्र गुणवत्तापूर्ण (Quality Cases) कारवाया करत मोठा खुलासा केला आहे. या कारवायांमध्ये एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून १२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, तसेच विभागीय उपआयुक्त, पुणे विभाग सागर धोमकर यांच्या आदेशानुसार आणि अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

 

 बनावट देशी दारू साखळीवर छापा; ७४४० बाटल्या जप्त

दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. ३, पुणे यांनी मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे चाकण–शिक्रापूर रोडलगत नदीच्या पुलाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. या कारवाईत देशी दारू ‘टॅंगो पंच’च्या बनावट सिलबंद ७,४४० बाटल्या आणि मोबाईल जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ३,६०,२०० इतकी आहे. या प्रकरणी वाहिद साजिद शेख (रा. मेदनकरवाडी, चाकण) यास अटक करण्यात आली.

 

रिकव्हरी कारवाया

रिकव्हरी क्र. १: कुरुळी फाटा येथे छापा टाकून १० मिली क्षमतेच्या ७६ बनावट बाटल्या जप्त; दिलीप गोविंद अक्कलवाड यास अटक.

रिकव्हरी क्र. २: कुरुळी येथील हॉटेल भक्तीशा येथे छापा; १८० मिली व ९० मिली क्षमतेच्या बनावट बाटल्या व मोबाईल जप्त; अरविंद केलास नया यास अटक.

या संपूर्ण प्रकरणात एकूण ३,७३,९८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासात सदर मद्य पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

 

 

 

‘फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओन्ली’ विदेशी मद्याचा अवैध साठा उघड

दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खेड विभाग यांनी चन्होली खुर्द (ता. खेड) येथील महालक्ष्मी किराणा स्टोअर येथे छापा टाकला. दुकानाच्या आडोशाला सिग्नेचर, पायपर, आफ्टर डार्क, ब्लॅक डॉग रिझर्व्ह, ब्लेंडर्स प्राइड आदी ब्रँडचा ‘फॉर डिफेन्स सर्व्हिसेस ओन्ली’ असा शिक्का असलेला २६३ बाटल्यांचा विदेशी मद्यसाठा आढळून आला.

 

या प्रकरणी महादेव माणिकराव पवार यास अटक करण्यात आली असून वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹९,०६,४७५ आहे.

 

 

 

कायदेशीर कारवाई

दोन्ही प्रकरणांत आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५(ई), ८०, ८१, ८३, १०, १०३ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून काहींना पोलीस कोठडी, तर काहींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

निवडणूक, नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कडक पाळत

पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणुका, नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री रोखण्यासाठी २१ पथके कार्यरत आहेत. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत ४ गुणवत्तापूर्ण गुन्हे, ९ आरोपी अटक, ५ वाहने जप्त करत ₹६१,०८,८३५ किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एका सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

 

अवैध मद्याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा 020-26127321 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

Local ad 1