पुणे : पुण्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणावरून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने पुणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक स्वरूपात कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात सुमारे दोन तास तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. (pune youth congress protest over poisonous liquor case)
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, विषारी दारूकांडातील दोषी अधिकारी आणि संबंधित विभागाविरोधात अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात आला.
pune toxic liquor case : राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी-कर्मचारी निलंबित
या आंदोलनात युवक काँग्रेसचे मीडिया विभागाध्यक्ष अक्षय जैन, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी विभागाच्या कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना रोखले. काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते; मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने युवक काँग्रेसच्या प्रतिनिधीमंडळाची उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी प्रतिनिधींनी निवेदन सादर करत अवैध दारू नेटवर्कवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावून नंतर सोडून दिले. दरम्यान, लवकरात लवकर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.

