...

पुण्यात ‘एपस्टीन फाईल्स’वरून युवक काँग्रेसचा रास्ता रोको ; केंद्र सरकारवर गंभीर आरोप

 

पुणे : ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणातील कथित खुलाशांबाबत केंद्र सरकार मौन बाळगत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. शहरातील बालगंधर्व चौक येथे झालेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काही काळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली व काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. (pune youth congress protest epstein files)

 

हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, निरीक्षक ॲड.विवेक गावंडे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासह प्रथमेश आबनाव, गणेश उबाळे, राहुल शिरसाट, आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत, ॲड. अविनाश सोळुंके, अथर्व सोनार, पुष्कर आबनावे, अजिनाथ केदार, सद्दाम शेख, स्वप्नील गायकवाड, निशांत देशमुख, यश कोलते, विक्रांत धोत्रे, विकास सुपनार, दिनेश सरताळे, रेहान बाबुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावपूर्ण आणि संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती. वाहतुकीवर परिणाम झाल्याने पोलिसांनी तत्काळ हालचाल करून रस्ता मोकळा केला.

युवक काँग्रेसकडून असा आरोप करण्यात आला की, लोकशाही व्यवस्थेत प्रश्न विचारणे हा गुन्हा नसून, सरकारकडून सत्य दडपण्याचा आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘एपस्टीन फाईल्स’मधील कथित खुलाशांवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि स्वतंत्र, निष्पक्ष चौकशीची घोषणा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले,“‘एपस्टीन फाईल्स’मधील खुलाशांनी संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. मात्र भारतात केंद्र सरकार यावर एक शब्दही बोलायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन संशयास्पद वाटते. सत्ताधाऱ्यांना भीती नसेल, तर स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची घोषणा करावी. युवक काँग्रेस सरकारच्या या भूमिकेविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही.”

युवक काँग्रेसचे प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले, “भाजप सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबायची जुनी सवय आहे. आज विरोधी पक्ष आणि लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘एपस्टीन’ प्रकरण हा जागतिक स्तरावर चर्चेचा विषय आहे. इतक्या संवेदनशील मुद्द्यावरही केंद्र सरकार भूमिका स्पष्ट करत नाही, हे चिंताजनक आहे.” जैन यांनी केंद्र सरकार आणि अमेरिकन प्रशासनामध्ये पडद्यामागे चर्चासत्रे सुरू असल्याचा आरोपही केला. मात्र या दाव्यांवर अधिकृत पातळीवर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

 

रास्ता रोकोचा प्रयत्न होताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असून परिस्थिती नंतर सुरळीत झाली. घटनेदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली.

 

 

Local ad 1