Bhimashankar Latest Update। सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी भीमाशंकर सज्ज ; जाणून घ्या मंदिर उघडण्याची तारीख
Bhimashankar Latest Update पुणे : नाशिक येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरू असलेली विकासकामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. त्यामुळे 15 जून 2026 पासून भीमाशंकर मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
pune toxic liquor case : राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ अधिकारी-कर्मचारी निलंबित
प्रयागराज महाकुंभ 2025 च्या अनुभवाच्या आधारे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात नवीन सभामंडप तसेच पायरी मार्गाच्या कामासाठी देवस्थान ट्रस्टने 9 जानेवारी 2026 पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या बंद कालावधीस 15 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
विषारी दारूमुळे मृत्यू; युवक काँग्रेसचा उत्पादन शुल्क विभागावर हल्लाबोल
मुख्य सभामंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी साधारणतः एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असतानाही, भीमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यामुळे हे काम अवघ्या पाच महिन्यांत पूर्णत्वास येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. रात्रंदिवस सुरू असलेल्या कामामुळे मंदिर परिसरातील महत्त्वाची विकासकामे वेळेत पूर्ण होऊ शकली.
सध्या मुख्य सभामंडपाचे काम अंतिम टप्प्यात असून दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची कामेही 10 जूनपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित किरकोळ कामे जलदगतीने पूर्ण करून बांधकाम साहित्य, दगड आणि यंत्रसामग्री हटवून परिसर भाविकांसाठी मोकळा करण्यात येणार आहे. देवस्थान ट्रस्टने भाविक तसेच स्थानिक नागरिकांना मंदिर प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

