Mhada Pune Lottery । पुणे : म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या ४ हजार ४६२ सदनिकांच्या सोडतीसाठी आतापर्यंत ९७ हजार ७०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ५२ हजार २७६ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून, अर्ज प्रक्रियेतून आतापर्यंत १ कोटी ६२ लाख ९३ हजार ५३२ रुपये जमा झाले आहेत. ऑनलाइन कागदपत्र पडताळणी प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे अर्ज करण्याची मुदत एक महिन्याने वाढविण्यात आली आहे. आता इच्छुकांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत या सदनिकांची सोडत काढण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याची मूळ मुदत १५ सप्टेंबर होती. ती आता १५ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
एकूण ४ हजार ४६२ सदनिकांपैकी २ हजार ९७१ सदनिका २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत, तर १ हजार ४९१ सदनिका १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेंतर्गत आहेत. यामध्ये पुणे महापालिका हद्दीतील १ हजार ४६८, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील १ हजार ४०६ आणि पीएमआरडीए क्षेत्रातील १ हजार ५८८ सदनिकांचा समावेश आहे.
Maharashtra MLC Election 2026 । विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे तीन उमेदवार जाहीर
अर्ज करण्यासाठी अद्याप मुदत असल्याने काही अर्जदारांनी अनामत रक्कम भरलेली नाही. त्यामुळे मुदत संपेपर्यंत अनामत रक्कम भरणाऱ्या अर्जदारांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
असे आहे सोडतीचे वेळापत्रक
- १५ ऑक्टोबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत : ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत
- १५ ऑक्टोबर, रात्री ११.५९ वाजेपर्यंत : ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची मुदत
- १६ ऑक्टोबर, दुपारी ३ वाजेपर्यंत : आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची मुदत
- १२ नोव्हेंबर, सायंकाळी ७ वाजता : स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी
- १४ नोव्हेंबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत : दावे-हरकती नोंदविण्याची मुदत
- २० नोव्हेंबर, सायंकाळी ७ वाजता : स्वीकृत अर्जांची अंतिम यादी
- २६ नोव्हेंबर, सकाळी ११ वाजता : सदनिकांची सोडत
- २६ नोव्हेंबर, सायंकाळी ६ वाजता : यशस्वी अर्जदारांची नावे जाहीर

