...

“गुन्हेगारांना थेट तुरुंगात पाठवणार ! पुण्यात फडणवीसांचा कडक इशारा”

 

पुणे : “पुणे हे केवळ शहर नाही, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे,” असे ठामपणे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी ‘पुणे ग्रोथ हब’ या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याची घोषणा केली. सध्या राज्याच्या 580 अब्ज डॉलरच्या जीडीपीमध्ये पुण्याचा वाटा 78 अब्ज डॉलर असून तो पुढील काही वर्षांत 280 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्राचा एकत्रित विकास करून उद्योग, स्टार्टअप्स, आयटी, उत्पादन, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘संवाद पुणेकरांशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. (pune growth hub devendra fadnavis pmc election vision)

 

 

Ajit Pawar Pune Manifesto 2025 | “मोफत मेट्रो, रोज पाणी, 200 क्लिनिक! अजित पवारांचा पुण्यासाठी ‘मेगाप्लॅन’

 

“देवाभाऊ काही बोलत नाही, देवाभाऊचे काम बोलते”

भाषणात राजकीय टोनही दिसून आला. “देवाभाऊ काही बोलत नाही, देवाभाऊचे काम बोलते,” असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “केवळ मोफत घोषणा करून निवडणूक जिंकता येत नाही,” असे सूचक विधान करत त्यांनी मोफत विमान प्रवास, मोफत तिकिटे अशा घोषणांवर जोरदार टोला लगावला.

 

 

मेट्रो, भुयारी रस्ते आणि 5 हजार ई-बस

 

पुण्यात सध्या 100 किमीचे मेट्रो जाळे उभारले जात असून, मेट्रो व पीएमपी बससाठी ‘सिंगल तिकीट’ प्रणाली लवकरच लागू केली जाणार आहे. सध्या असलेल्या 1,000 ई-बसची संख्या 5,000 पर्यंत वाढवली जाईल, त्यामुळे शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ‘एंड टू एंड’ प्रवास शक्य होईल. पुणे 500 चौरस किमी क्षेत्रात पसरले असून केवळ 9 टक्के रस्ते उपलब्ध आहेत. 32 प्रमुख रस्त्यांवर क्षमतेपेक्षा अडीचपट वाहतूक असल्याने 56 किमी भुयारी रस्ते आणि 23 उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे 32 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुणे रिंग रोडमुळे शहरातील 40 टक्के वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

सरकारी रुग्णालयांवर अचानक छापे! आरोग्य विभागाचे ‘भरारी पथक’ मैदानात

 

पाण्याची गळती, नव्हे तर व्यवस्थापन ही खरी समस्या

“पुणेकर जास्त पाणी वापरतात असे म्हटले जाते, पण खरी समस्या 40 टक्के गळती आहे,” असे स्पष्ट करत फडणवीस म्हणाले की, समान पाणीपुरवठा योजनेचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. जुन्या पाइपलाईन बदलून अधिक उत्तरदायी वितरण व्यवस्था तयार केली जाईल. भविष्यातील वाढ लक्षात घेऊन सांडपाण्याचा पुनर्वापर आणि नवीन जलस्रोत शोधण्यावर सरकार भर देणार आहे.

टेकड्या वाचवूनच पुण्याचा विकास
पुण्यातील टेकड्यांबाबत भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, “टेकड्या हिरावल्या जाणार नाहीत. तिथली अतिक्रमणे हटवून पुनर्वसन केले जाईल. डोंगर आणि जैवविविधता 100 टक्के वाचवतच पुण्याचा शाश्वत विकास केला जाईल.”

 

 

“गुन्हेगारांची जागा महापालिकेत नाही, तर तुरुंगात”

तिकीट वाटपावरून मित्रपक्षांना सूचक इशारा देताना फडणवीस म्हणाले, “निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची असली तरी गुन्हेगारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणे पुणेकरांना मान्य नाही. गुन्हेगार निवडून आले तरी त्यांची जागा महापालिकेत नाही, तर तुरुंगातच असेल.” गृहमंत्री म्हणून पुण्याची गुन्हेगारी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

चांगला नेता कोण?

राजकारणात तिकीट वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा “निवडून येण्याची क्षमता” महत्त्वाची ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, चांगला नेता तोच असतो जो पुढील 20 वर्षांचा विचार करून लोकांना प्रेरणा देतो आणि सर्वांना सोबत घेतो, असे मत त्यांनी मांडले.

 

 

 

 

❓ प्रश्न–उत्तर

 

Q1. ‘पुणे ग्रोथ हब’ म्हणजे काय?
➡ पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए परिसराचा एकत्रित विकास करून उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधा वाढवण्याची योजना.

Q2. पुण्याचा जीडीपी किती वाढवण्याचे उद्दिष्ट आहे?
➡ सध्याचा ७८ अब्ज डॉलरचा वाटा २८० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

Q3. पुण्यासाठी कोणते मोठे प्रकल्प जाहीर झाले?
➡ १०० किमी मेट्रो, ५६ किमी भुयारी रस्ते, २३ उड्डाणपूल, ५,००० ई-बस, पुणे रिंग रोड.

Q4. पाणी समस्येवर काय उपाय आहे?
➡ गळती थांबवण्यासाठी नवीन वाहिन्या, सांडपाण्याचा पुनर्वापर व समान पाणीपुरवठा योजना.

Q5. गुन्हेगार उमेदवारांबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?
➡ गुन्हेगारांची जागा महापालिकेत नाही तर तुरुंगात आहे, असा स्पष्ट इशारा दिला.

Local ad 1