Pune Election News पुणे | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पीएमपीएमएल बस आणि पुणे मेट्रोमध्ये मोफत प्रवास देण्याची केलेली घोषणा ही फसवी असून ती केवळ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली असल्याची जोरदार टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, अमोल कविटकर आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
“12वी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 12 जानेवारीपासून HSC Hall Ticket ऑनलाईन – लगेच तपासा”
पाटील म्हणाले की, “मोफत प्रवास योजना चांगली असू शकते, मात्र ती केवळ अजित पवार एकट्याने जाहीर करू शकत नाहीत. यासाठी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी आवश्यक आहे. महायुती हे तीन पक्षांचे सरकार असून, कोणताही एक नेता स्वतंत्रपणे अशी घोषणा करू शकत नाही.” ते पुढे म्हणाले की, “अजित पवार यांना माहीत आहे की पुणे महापालिकेत त्यांची सत्ता येणार नाही. त्यामुळे बिहार निवडणुकीप्रमाणे फसव्या घोषणा करून मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे.”
चंद्रकांत पाटील यांनी १९९९ मधील अजित पवारांच्या मोफत वीज योजनेचा दाखला देत टोला लगावला. “तेव्हा सरकार आल्यानंतर ‘प्रिंटिंग मिस्टेक’ असल्याचे सांगण्यात आले होते. याही घोषणेबाबत तसाच प्रकार होण्याची शक्यता आहे,” असा चिमटाही त्यांनी काढला.
पीएमपीएमएल बससेवा सध्या तोट्यात असून पुण्याचा पालकमंत्री असताना सुमारे १,००० कोटी रुपयांचा तोटा झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. “एमएनजीएलचे ६५ कोटी रुपये अजून मनपाकडे थकीत आहेत. अशा परिस्थितीत मोफत बस सेवा कशी चालवणार? त्यासाठी राज्य सरकारचा निधी लागणार आहे,” असे ते म्हणाले.
अजित पवार यांनी महिलांसाठी उच्च शिक्षणात ५० टक्के शुल्क माफीच्या निर्णयासाठी सहा महिने विलंब लावला होता. “तेव्हा राज्याच्या तिजोरीवर ताण येतो असे सांगणारे अजित पवार आज अचानक कोट्यवधींच्या मोफत योजनांची घोषणा करत आहेत, हे आश्चर्यकारक आहे,” अशी टीकाही पाटील यांनी केली.
दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “भाजपला अंतर्गत सर्व्हेनुसार ११५ जागा निश्चित मिळत असून प्रदेशाध्यक्षांच्या मायक्रो प्लॅनिंगमुळे हा आकडा १२५ पर्यंत जाईल. पुण्याचा पुढचा महापौर भाजपचाच असेल.”
Web Title : Ajit Pawar Free Travel Scheme Fake | Chandrakant Patil Attack

