पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, अखेरच्या क्षणापर्यंतही बहुतांश राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शहराच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि राजकीय घडामोडींना वेग आला होता. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक, सुमारे २५०० इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आधीपासूनच वर्तविली जात होती. त्यानुसार यंदाच्या निवडणुकीत भाजपाकडून सुमारे २५ माजी नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले आहे. (pune municipal election 2026 amol balwadkar joins ncp)
कोथरूड भागातील माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पूर्णतः तयार होते. मात्र, त्या वेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढत निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितले होते. त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीत त्यांना संधी मिळेल आणि महापालिकेत महत्त्वाचे पद दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी काही तास आधीच अमोल बालवडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि त्यांच्या जागी लहू बालवडकर यांना संधी देण्यात आली. या निर्णयानंतर अमोल बालवडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
ते पुढे म्हणाले, “आता पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाने माझ्याशी दगा – फटका केला आहे. मला दोन दिवस आधी जरी उमेदवारी नाकारल्याचे सांगितले असते, तरी मी तो निर्णय मान्य केला असता. मात्र, ऐनवेळी उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यामुळे मी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून मला येथे उमेदवारी देण्यात आली आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप करत अमोल बालवडकर यांनी या घटनेचा फटका भाजपाला आगामी निवडणुकीत बसणार असल्याचा दावाही केला आहे.
प्रश्न – उत्तर (FAQ)
प्र. अमोल बालवडकर यांनी भाजप का सोडला?
उ. पुणे महापालिका निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला.
प्र. अमोल बालवडकर कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे?
उ. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
प्र. भाजपाने किती माजी नगरसेवकांचे तिकीट कापले आहे?
उ. यंदाच्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाने सुमारे २५ माजी नगरसेवकांचे तिकीट कापले आहे.
प्र. अमोल बालवडकर यांचा आरोप काय आहे?
उ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही आणि भाजपाने आपल्याशी दगा-फटका केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

