पुणे : सरकारी रुग्णालयांतील आरोग्य सेवा सुरळीत सुरू आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके कोणत्याही रुग्णालयाला अचानक भेट देऊन तपासणी करणार असून, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता, सुरक्षा आणि रुग्णसेवेचा दर्जा यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. (pune health department flying squad government hospitals inspection)
महापालिका निवडणूक जवळ! पुण्यात कुठे किती मतदान केंद्रे? सविस्तर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळांतर्गत दोन भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच स्त्री रुग्णालयांची अचानक तपासणी करणार आहेत.
पहिल्या भरारी पथकात आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. आरिफ सय्यद, कार्यक्रम व्यवस्थापक गणेश जगताप, मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी धनाली कौलगे आणि सुविधा व्यवस्थापक सागर शेळके यांचा समावेश आहे. दुसऱ्या पथकात प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत बडगीरे आणि राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. रोहन घुगे यांचा समावेश आहे.
भरारी पथके रुग्णालयांच्या इमारतींची अवस्था, सुरक्षितता आणि स्वच्छता यासोबतच नागरिकांसाठी असलेले सूचना फलक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, उपलब्ध मनुष्यबळ, गणवेश व ओळखपत्रांची तपासणी करणार आहेत. बाह्यरुग्ण (OPD) व आंतररुग्ण (IPD) विभागातील रुग्णसेवेचाही सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. तसेच जीवनावश्यक औषधांचा साठा, ई-औषधी प्रणालीतील नोंदी आणि कालबाह्य औषधांची पडताळणीही भरारी पथकांकडून केली जाणार आहे.
दरम्यान, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरीय तपासणी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांच्या नेतृत्वाखाली चार पथके नेमण्यात आली असून, ही पथके सरकारी रुग्णालयांची नियमित तपासणी करणार आहेत. सरकारी रुग्णालयांमधील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी स्पष्ट केले आहे.
प्रश्न–उत्तर (FAQ Schema साठी उपयुक्त)
प्रश्न 1 : भरारी पथकांचा उद्देश काय आहे?
उत्तर : सरकारी रुग्णालयांतील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या दूर करण्यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत.
प्रश्न 2 : भरारी पथके कोणत्या जिल्ह्यांमध्ये तपासणी करणार आहेत?
उत्तर : पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणी होणार आहे.
प्रश्न 3 : तपासणीदरम्यान कोणत्या बाबींवर भर दिला जाणार आहे?
उत्तर : स्वच्छता, सुरक्षा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रुग्णसेवा, औषध साठा, ई-औषधी नोंदी आणि रुग्णालयाची एकूण व्यवस्था तपासली जाणार आहे.
प्रश्न 4 : जिल्हास्तरीय पथकेही नेमण्यात आली आहेत का?
उत्तर : होय, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी स्वतंत्र जिल्हास्तरीय पथके नेमण्यात आली असून ती नियमित तपासणी करणार आहेत.

