...

अमेरिका, चीन, रशियापेक्षा व्यापारासाठी भारताला कोणता देश अधिक योग्य ; काय म्हणाले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

पुणे : अमेरिका, चीन आणि रशिया या देशांची व्यापार व परराष्ट्र धोरणे अधिक क्लिष्ट असून भारतासाठी व्यापाराच्या दृष्टीने युरोप हा अधिक विश्वासार्ह आणि अनुकूल भागीदार ठरू शकतो, असे मत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. तसेच आखाती देशांसह मध्य आशियाई राष्ट्रांशी भारताने आपले संबंध अधिक दृढ करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (india europe trade jaishankar pune book festival)

 

 

शनिवारी दुपारी पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित कार्यक्रमात त्यांनी तरुणाईशी संवाद साधला. नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी परराष्ट्र धोरण, कूटनीतीत रामायण–महाभारताचे महत्त्व, तसेच सध्याची जागतिक व्यापारस्थिती यावर जयशंकर यांनी सखोल भाष्य केले.

 

जोखीम घ्यावी लागते, कूटनीती प्रभावी असावी

फॉरेन पॉलिसीत यश मिळवण्यासाठी विविध देशांना वारंवार भेटी द्याव्या लागतात. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कधी कधी जीवनात जोखीम घ्यावी लागते, तसेच कूटनीती प्रभावीपणे राबवावी लागते. आपले विचार योग्य प्रकारे मांडले नाहीत, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण होतो, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

 

हनुमान आणि श्रीकृष्ण – श्रेष्ठ कूटनीतिज्ञ

जयशंकर म्हणाले की, त्यांच्या आयुष्यावर हनुमान आणि श्रीकृष्ण यांच्या कूटनीतीचा मोठा प्रभाव आहे. एक मुत्सद्दी म्हणून काम करताना या दोघांच्या कूटनीतीचा उपयोग मला वारंवार झाला. देशहितासाठी कधी कधी अपेक्षेपेक्षा अधिक योगदान द्यावे लागते.

 

गल्फ देशांवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ओमानसह इतर देशांच्या दौऱ्यावरून परत आलो असून, गल्फ देशांवर भारतीय संस्कृतीचा खोल प्रभाव आहे. त्यामुळे हे देश भारतासोबत व्यापार वाढवण्यास उत्सुक आहेत. कंबोडियामध्ये भारतापेक्षाही अधिक हिंदू मंदिरे असल्याचे उदाहरण त्यांनी दिले.

 

युरोप, अमेरिका, चीन व शेजारी देशांशी संतुलित संबंध आवश्यक

अमेरिका, चीनसह शेजारी देशांशीही चांगले संबंध ठेवण्यासाठी कूटनीती अत्यावश्यक आहे. युरोपियन देश भारतासोबत विविध क्षेत्रांत भागीदारी करण्यास इच्छुक आहेत. कोरोना काळात भारताने अनेक देशांना लसी पुरवल्या, हे भारताच्या सॉफ्ट पॉवरचे उत्तम उदाहरण आहे. वीज, रेल्वे, पाणी यासारख्या क्षेत्रांतही आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संधी शोधल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.

 

भारत जागतिक ब्रँड म्हणून उदयास

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीय तरुणांना रशियात शिक्षण व कामासाठी आमंत्रित केले आहे. भारत आज जागतिक ब्रँड म्हणून पुढे येत असून, कूटनीतीचे यश देशाच्या नेतृत्वावरही अवलंबून असते. त्यामुळेच हनुमानजींची कूटनीती मला विशेष भावते, असे जयशंकर म्हणाले.

 

यशासाठी निर्णयक्षमता आणि योग्य करिअर आवश्यक

मोठ्या व्यक्तींनी त्यांच्या कार्यकाळात परिस्थितीनुसार घेतलेले निर्णय समजून घेण्यासाठी मला त्यांच्या चरित्रांचे वाचन आवडते. १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ यांची बायोग्राफीही मी वाचली आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य निर्णय घेणे आणि आवडीचे करिअर निवडणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

 

‘द इंडिया वे’ पुस्तकाचा जागतिक प्रवास

परराष्ट्र सेवेतील निवृत्तीनंतर मी ‘द इंडिया वे’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा इंग्रजीसह हंगेरीयन आणि जपानी भाषांमध्ये अनुवाद झाला असून, फ्रान्समधील एका प्रकाशकाने फ्रेंच भाषेत अनुवाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहितीही जयशंकर यांनी दिली.

 

Local ad 1