ACB Pune News। पुणे : शेतजमिनीच्या सपाटीकरण, विहीर खोदकाम आणि पाइपलाइन परवानगी मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना लोणी काळभोर येथील अपर तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी अक्षय शिवाजी कोल्हे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
Pune Pimpri Chinchwad illicit liquor case विषारी दारूमुळे पुणे-पिंपरी चिंचवड हादरले !
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जमीन खरेदी-विक्री व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांनी हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतजमिनीच्या सपाटीकरण, विहीर खोदकाम आणि पाइपलाइन टाकण्याच्या परवानगीसाठी अपर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. संबंधित प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी अक्षय कोल्हे याने सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपी अधिकाऱ्याने तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार एसीबीने सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना पकडले.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

