पुणे, दि. 31 मे : परीक्षा घोटाळे, पेपरफुटी, वाढती बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यात भव्य मशाल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन ते झाशी राणी चौक (बालगंधर्व चौक) दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून आलेले हजारो युवक, विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (youth congress mashal morcha pune paper leak unemployment protest)
मोर्चादरम्यान “पेपरफुटी बंद करा”, “युवकांना न्याय द्या”, “रोजगार द्या”, “विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. युवक काँग्रेसने केंद्र सरकारच्या युवकविरोधी धोरणांचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.
MHTIMES EDITORIAL | विषारी दारूकांड : मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार ?
उदय भानू चिब यांनी सांगितले की, परीक्षा घोटाळे आणि भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे देशातील युवकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी सरकारवर टीका करताना बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेतील गैरप्रकार हे युवकांच्या भवितव्याशी केलेला विश्वासघात असल्याचे म्हटले.
यावेळी महासचिव अजय छिकारा, नवज्योत संधू, शांभवी शुक्ला, तारिक बागवान, अक्षय जैन, प्रशांत ओगले, तन्वीर विद्रोही, प्रथमेश बागवे, आफरीन शेख, आमिर अब्दुल, अनुराग भोयर, प्रवीण बिरादार, विवेक गावंडे, गणेश उबाळे आदी उपस्थित होते.
मोर्चादरम्यान परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, दोषींवर कठोर कारवाई, रिक्त सरकारी पदांची तातडीने भरती आणि रोजगारनिर्मितीचे धोरण जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

