NEET paper leak Pune। नीट पेपरफुटीचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; ब्युटी पार्लर चालक महिला सीबीआयच्या ताब्यात
NEET paper leak Pune । पुणे : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांनी बिबवेवाडी परिसरातून एका ब्युटी पार्लर चालक महिलेला ताब्यात घेतले असून, चौकशीनंतर तिला केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)च्या ताब्यात देण्यात आले आहे.
मनीषा वाघमारे (वय ४६) असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मनीषा बिबवेवाडी परिसरात ब्युटी पार्लर चालवत होती. मात्र, हे पार्लर केवळ आडोसा असून त्यामागे पेपरफुटी आणि महाविद्यालयीन प्रवेश मिळवून देण्याचे रॅकेट चालत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
बारामतीत पुन्हा विमान कोसळले ; गोजुबावी परिसरात अपघात, वैमानिक सुरक्षित
तपासादरम्यान मनीषा वाघमारेचा मुख्य आरोपी धनंजय लोखंडे याच्याशी संपर्क असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचवणे आणि प्रवेश प्रक्रियेत मदत करणे, अशी भूमिका तिची असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुणे पोलिसांनी पहाटे कारवाई करत तिचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अन्य तांत्रिक उपकरणे जप्त केली. तपासात मनीषा आणि धनंजय लोखंडे यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट्स तसेच कॉल रेकॉर्ड समोर आले आहेत. विशेष म्हणजे, पेपरफुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतरही दोघे एकमेकांच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळले आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी पुणे पोलिसांनी मांजरी परिसरातून आणखी एका तरुणाला ताब्यात घेतले. तो नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. नीट परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांचा शोध घेणे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती का, याचा तपास सुरू आहे. देशभरातील सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. पेपरफुटी उघडकीस आल्यानंतर देशभरात मोठा गोंधळ निर्माण झाला असून तपास आता अधिक व्यापक करण्यात आला आहे.

