NEET घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक ; पुण्यात पुतळा जाळून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

गुडलक चौकात आंदोलन; पेपरफुटी, गैर व्यवस्था आणि भ्रष्टाचाराविरोधात केंद्र सरकारचा निषेध

 

पुणे : देशभरात गाजत असलेल्या NEET परीक्षेतील पेपरफुटी, गैर व्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने बुधवारी पुण्यातील गुडलक चौक येथे तीव्र आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी NEETचा प्रतीकात्मक पुतळा जाळत केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाविरोधात घोषणाबाजी केली.

 

NEET paper leak Pune। नीट पेपरफुटीचे धागेदोरे पुण्यापर्यंत ; ब्युटी पार्लर चालक महिला सीबीआयच्या ताब्यात

 

 

युवक काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मेहनतीची खिल्ली उडवणाऱ्या आणि शिक्षण व्यवस्थेचे राजकारण करणाऱ्या सरकारविरोधात जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला.

 

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “देशातील विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भ्रष्ट आणि निष्क्रिय व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. NEET परीक्षा गुणवत्तेपेक्षा भ्रष्टाचाराचे प्रतीक बनली आहे. शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा.”

 

युवक काँग्रेसचे राज्य मीडिया विभागाध्यक्ष अक्षय जैन यांनी, “जे सरकार परीक्षा सुरक्षित ठेवू शकत नाही, ते देशाचे भविष्य काय सुरक्षित ठेवणार? विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख करणाऱ्या सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे,” असा आरोप केला.

 

प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश अबनावे यांनी NEET घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. “विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फेरणाऱ्या व्यवस्थेविरोधात देशभरातील युवक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरतील,” असे ते म्हणाले.

 

या आंदोलनात शिवराज मोरे, अक्षय जैन, प्रथमेश अबनावे, मोहसीन शेख, भूषण रानभरे, सौरभ अमराळे, अंजनेय साठे, अथर्व सोनार, सद्दाम शेख, अभिषेक अवचार, निखिल मलके, सागर धाडवे, ओंकार मोरे, विशाल कामेकर, दिनेश सरताळे, विकास सुपनार, सूरज, प्रसन्न मोरे, तेजस बनसोड यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

Local ad 1