पुणे : पुणे महापालिकेत भाजपचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून येण्यासाठी नेमके काय काम केले, असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. माणसे फोडणे, विकत घेणे आणि दहशतीचे राजकारण हा भाजपचा देशभरातील उद्योग असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणे महापालिकेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला बुधवारी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. पुण्यातील भाजपच्या यशामागे विकास नसून काळा पैसा, ठेकेदार आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचे राजकारण असल्याचा घणाघात त्यांनी केला. (sanjay raut slams bjp over pune politics tree cutting)
याप्रसंगी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते नितीन गावडे, राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
पुण्याच्या महापौर बंगल्यात ‘ग्रीन किलिंग’; 20 झाडांची निर्दयी कत्तल
महापौर बंगल्यातील झाडतोडीवर संताप
महापौर बंगल्यातील 20 झाडांच्या तोडप्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, “झाडांची कत्तल हा फक्त पुण्याचा विषय नसून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाचा प्रश्न आहे. विकासाच्या नावाखाली होणारी जंगलतोड ही क्लायमेट चेंजचे मोठे कारण आहे.” मुंबईतील आरे जंगलातील झाडतोड, नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड यांचा उल्लेख करत त्यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्यांवर संताप
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत होणाऱ्या वादग्रस्त विधानांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “शिवाजी महाराज राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आहेत. त्यांचे नाव घेण्याची काही लोकांची लायकी नाही.”
पाणीटंचाईवर उपरोधिक टोला
पुण्यातील पाणीटंचाईवर भाष्य करताना त्यांनी भाजपला मतदान केलेल्या पुणेकरांना उपरोधिक टोला लगावला. “ज्यांनी भाजपला 119 नगरसेवक दिले, त्यांनी फक्त ‘नमो नमो’चा जप करावा, त्यांच्या नळाला पाणी येईल,” असे ते म्हणाले.
अंधश्रद्धेला फाटा
अजित पवार यांच्या घराबाहेर अघोरी पूजा किंवा जादूटोण्याच्या चर्चांवर बोलताना राऊत म्हणाले, “अशा अंधश्रद्धांना थारा नाही. बोकड कापून सरकारे बदलली असती, तर लोकांनी ते खूप आधी केले असते.”


