पुणे : शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या घोले रस्ता येथील अधिकृत बंगल्यात तब्बल 20 झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त फांद्या छाटण्याच्या नावाखाली अनेक वर्षे जुनी, डेरेदार वृक्ष तोडण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. (pune mayor bungalow tree cutting controversy) महापौर बंगल्याच्या परिसरात चिंच, पिंपळ, उंबर, कडूलिंब यांसारखी मोठी वृक्ष तसेच शोभेची झाडे मोठ्या प्रमाणात होती. या वृक्षांमुळे बंगला आकर्षक दिसत होता. मात्र अलीकडे या झाडांची मोठ्या प्रमाणावर तोडणी करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीनंतर बंगल्याचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याचवेळी काही झाडे तोडण्यात आली. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार फक्त छाटणी करण्यात आली असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात काही झाडांच्या सर्व फांद्या तोडण्यात आल्या असून, तीन झाडे मुळासकट उपटण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही झाडांवर गंभीर घाव घालण्यात आल्याने ही तोडणी अत्यंत निर्दयी पद्धतीने झाल्याचा आरोप होत आहे.
महापालिकेच्या नियमानुसार, शहरातील कोणतेही झाड तोडण्यासाठी किंवा छाटणीसाठी वृक्षप्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक असते. यासाठी झाड तोडण्याचे कारण, छायाचित्रे आणि वर्तमानपत्रात नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणात नेमकी कोणती प्रक्रिया राबवण्यात आली, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती दिली जात नाही.
या घटनेमुळे शहरातील वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महापौरांच्या निवासस्थानीच अशी घटना घडल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संदर्भात सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांनी सांगितले की, झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती. मात्र नेमकी परवानगी कोणी आणि केव्हा घेतली याबाबत माहिती घेऊनच पुढील प्रतिक्रिया देऊ.
दरम्यान, महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्पष्ट केले की, “मी राहण्यासाठी जाण्याच्या आधी झाडांची तोडणी सुरू होती. मी ते पाहिल्यानंतर दोन दिवस काम थांबवण्यात आले. झाडे खराब झाल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच आवश्यक परवानगी घेतल्याची माहिती दिली. त्यामुळे झाडांवर उपचार करण्यासाठीच ही तोडणी करण्यात आल्याचे मला सांगण्यात आले.”


