पुणे : देशातील निवासी स्थावर मालमत्ता बाजारपेठेत पुण्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत (H1 2026) शहरात ₹३७,०४८ कोटी मूल्यांची ४४ हजार २६५ घरे विकली गेल्याची नोंद झाली आहे. CREDAI पुणे आणि CRE Matrix यांनी महाराष्ट्राच्या नोंदणी महानिरीक्षक (IGR) कार्यालयाच्या अधिकृत नोंदणी आकडेवारीच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या ‘पुणे हाऊसिंग रिपोर्ट – जुलै २०२६’ मध्ये ही माहिती समोर आली आहे. मजबूत रोजगारनिर्मिती, आयटी व ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs)चा विस्तार आणि वास्तविक घरखरेदीदारांची सातत्यपूर्ण मागणी यामुळे पुण्याची निवासी बाजारपेठ देशातील इतर महानगरांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, पुण्याचे नेतृत्व केवळ चालू वर्षापुरते मर्यादित नाही. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत शहरात ४.२८ लाख घरांची नोंदणीकृत विक्री झाली असून, देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये हा सर्वाधिक आकडा आहे. या कालावधीत पुण्यात हैदराबादपेक्षा ३७ टक्के अधिक घरे विकली गेली असून, मुंबई आणि चेन्नई या दोन्ही शहरांतील एकत्रित निवासी विक्रीलाही पुण्याने मागे टाकले आहे. या कालावधीत सरासरी दर सहा मिनिटांनी एका घराची विक्री झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
गेल्या काही वर्षांत पुण्यातील घरांच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत विकल्या गेलेल्या घराचे सरासरी मूल्य ₹८४ लाखांवर पोहोचले असून, H1 2022 च्या तुलनेत त्यात ३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर निवासी व्यवहारांच्या एकूण मूल्यामध्ये ४२ टक्क्यांची वाढ झाली असून, प्रति चौरस फूट सरासरी किमतीतही २० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. ही वाढ केवळ किंमतवाढ नसून वास्तविक मागणीवर आधारित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
घर खरेदीदारांच्या पसंतीतही बदल दिसून येत आहे. H1 2026 मध्ये विकल्या गेलेल्या घरांपैकी २६ टक्के घरे ₹१ कोटींपेक्षा अधिक किमतीची होती. यावरून प्रीमियम आणि लक्झरी गृहनिर्माणाची मागणी सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते. मात्र, दुसरीकडे ७४ टक्के घरे ₹१ कोटींपेक्षा कमी किमतीत विकली गेल्याने पुणे अजूनही देशातील सर्वाधिक परवडणाऱ्या गृहनिर्माण बाजारपेठांपैकी एक असल्याचे अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे, ₹५० लाख ते ₹१ कोटी हा किंमतपट्टा अद्यापही सर्वाधिक सक्रिय विभाग ठरला आहे.
अहवालात शहरातील विविध मायक्रो-मार्केट्सचाही आढावा घेण्यात आला आहे. खराडी, वाघोली आणि परिसराचा समावेश असलेल्या उत्तर-पूर्व पुणे विभागात २०२२ पासून घरांच्या सरासरी किमतीत ५४ टक्क्यांची सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. आयटी कंपन्या आणि जीसीसीच्या विस्तारामुळे या भागातील निवासी मागणी सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तर दक्षिण-पश्चिम पुण्यात प्रति चौरस फूट किमतीत सर्वाधिक वाढ झाली असून, शहरातील निवासी विकासाचा विस्तार संतुलित पद्धतीने होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
CREDAI पुणेचे अध्यक्ष मनीष जैन म्हणाले, “पुण्याचा गृहनिर्माण बाजार हा वास्तविक घरखरेदीदारांच्या विश्वासावर आधारित आहे. घरांचे सरासरी मूल्य ₹८४ लाखांपर्यंत पोहोचले असले तरी ₹५० लाख ते ₹१ कोटी हा विभाग अजूनही सर्वाधिक मजबूत आहे. आयटी, जीसीसी आणि वाहन उद्योगाच्या विस्तारामुळे पुण्याचा निवासी बाजार भविष्यातही सक्षम राहील.”
CRE Matrixचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक किरण गुप्ता यांनी सांगितले की, “एकूण विक्रीत काही प्रमाणात स्थिरता आली असली तरी ती प्रामुख्याने कमी व मध्यम उत्पन्न गटापुरती मर्यादित आहे. प्रीमियम आणि लक्झरी गृहनिर्माण विभागात सातत्याने वाढ होत असून, मागील चार वर्षांत निवासी व्यवहारांच्या एकूण मूल्यात झालेली ४२ टक्क्यांची वाढ ही शहराच्या आर्थिक परिपक्वतेचे आणि घरखरेदीदारांच्या वाढत्या क्रयशक्तीचे द्योतक आहे.”
सातत्यपूर्ण रोजगारनिर्मिती, विकसित होत असलेली पायाभूत सुविधा, परवडणाऱ्या घरांचा मोठा पर्याय आणि प्रीमियम गृहनिर्माणातील वाढती गुंतवणूक यांच्या जोरावर पुणे देशातील निवासी स्थावर मालमत्ता क्षेत्रात नवा मानदंड निर्माण करत असून, भारताची गृहनिर्माण राजधानी म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

