महापालिका निवडणूक : ८५ वर्षांवरील मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा रद्द
maharashtra mahaparishad jyeshtha nagrik home voting cancel
मुंबई , महाराष्ट्रातील २९ महापालिकांमधील एकूण २८६९ जागांसाठी उद्या (गुरुवारी) मतदान होत असून राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. मात्र या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी महत्त्वाची असलेली घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाहीत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. (maharashtra mahaparishad jyeshtha nagrik home voting cancel)
Pune Municipal Election । “पुण्यात राजकीय युद्ध ! फडणवीस–अजित पवार आमनेसामने, महापौर कोणाचा?”
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी ‘१२ ड’ हा अर्ज भरून संबंधित अधिकाऱ्यांकडून घरीच मतदान प्रक्रिया पूर्ण केली जात होती. मात्र महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये अशी कोणतीही प्रक्रिया यंदा राबविण्यात आलेली नाही.
राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसाठी घरबसल्या मतदानाबाबत कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नसल्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावे लागणार आहे. अनेक वृद्ध नागरिकांसाठी हे शारीरिकदृष्ट्या कठीण असल्याने या निर्णयावर नाराजी व्यक्त होत आहे.
रात्री 10.30 वाजता जिल्हाधिकाऱ्यांचा धडक छापा… 3.32 कोटींचा मुद्देमाल जप्त !
निवडणूक अधिकाऱ्यांनी मात्र असे स्पष्ट केले आहे की, जरी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध नसली तरी मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र किंवा प्राधान्य रांग असेल. त्यामुळे त्यांना फार वेळ थांबावे लागणार नाही आणि ते थेट मतदान करू शकतील.
राज्य निवडणूक आयोगाने ही सुविधा न देण्यामागे कर्मचाऱ्यांची कमतरता हे प्रमुख कारण दिले आहे. घरोघरी जाऊन मतदान घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज असते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एवढ्या मनुष्यबळाची उपलब्धता नसल्यामुळे ही सुविधा रद्द करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाकडून वृद्ध, दिव्यांग आणि गरोदर महिलांसाठी मतदान केंद्रे शक्यतो तळमजल्यावर किंवा सहज उपलब्ध ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच व्हीलचेअर, रॅम्प आणि मदतनीस कर्मचाऱ्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
तरीही, ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांच्या मते, लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेली घरबसल्या मतदानाची सुविधा महापालिका निवडणुकांमध्येही मिळायला हवी होती. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शारीरिक अडचणी असलेल्या नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत जाणे कठीण होत असल्याने निवडणूक आयोगाने भविष्यात याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे.

