Pune Municipal Election पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा अखेरचा दिवस जोरदार शक्तीप्रदर्शनात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सर्वच पक्षांनी “महापौर आमचाच होणार” असा ठाम दावा केला आहे.
भाजपकडून खोट्या आरोपांची मोहीम ; बाबुराव चांदेरे यांचा थेट आरोप
या निवडणुकीत युती-आघाड्यांचे गणित पूर्णपणे कोलमडले. महायुतीतील भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीच्या शेवटच्या टप्प्यात फूट पडली. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे दोनच पक्ष आघाडीत उरले असून त्यांनी मनसेला सोबत घेतले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रचारात भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हेच प्रमुख चित्र राहिले. मुख्यमंत्री फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्या सभा व रॅली मोठ्या प्रमाणावर पार पडल्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्यात ठाण मांडून प्रचारात सक्रिय होते.
दुसरीकडे अजित पवार यांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली. विशेषतः पुणेकरांसाठी मेट्रो व बसचा मोफत प्रवास देण्याची घोषणा केल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.
काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, सतेज ‘बंटी’ पाटील, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रचारात सहभाग घेतला. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊत हे एकमेव स्टार प्रचारक होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे हे पुण्यातील प्रचारापासून दूर राहिले. शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, डॉ. नीलम गोऱ्हे, गुलाबराव पाटील, योगेश कदम आणि निलेश राणे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरे यांचा रोड शो, तसेच फडणवीस, अजित पवार, मुरलीधर मोहोळ आणि सुप्रिया सुळे यांच्या सभा आणि वाहन रॅलींनी वातावरण अधिकच तापवले. जाहीरनाम्यांवर टीका, एकमेकांवर आरोप आणि जोरदार राजकीय फटकेबाजीमुळे प्रचार शिगेला पोहोचला.
गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी आता सर्व पक्षांचे बूथनिहाय नियोजन सुरू झाले आहे. मतदार याद्यांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, संभाव्य पैसे वाटप आणि आमिष देण्याचे प्रकार रोखण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावण्याची तयारीही करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “फक्त कमळ चिन्हापुढील बटण दाबा आणि पुढील पाच वर्ष पुणेकरांनी कोणतीही चिंता करू नये. विकासाच्या जोरावर महापौर आमचाच होईल,” असा विश्वास व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “सुरुवातीला जी परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. मिळणाऱ्या प्रतिसादावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेत मॅजिक फिगर गाठेल. मी केंद्र किंवा राज्य सरकारवर टीका केली नाही, फक्त भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चुका दाखवल्या.”

