...

“फ्लेक्स, पेढे आणि फेक पोलिस… नर्हेतील तरुणाची करामत उघड”

पुणे: लग्नासाठी ‘शॉर्टकट’ शोधण्याच्या नादात नर्हे परिसरातील एका २६ वर्षीय तरुणाने पोलिस असल्याचा बनाव करत मोठे कांड घडवले. स्वतःला महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाल्याचे सांगत त्याने अभिनंदनाचे फ्लेक्स लावले, पेढे वाटले आणि सोशल मीडियावरही स्टेटस ठेवले. मात्र, हा बनाव लवकरच उघडकीस आला आणि अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा. नर्हे) असे या तरुणाचे नाव आहे. तो सिंहगड रोड परिसरात राहतो व भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. कुटुंबात आई व विवाहित बहिण असून, लग्नासाठी तो उत्सुक होता. चांगली नोकरी असल्यास विवाह लवकर जुळतो, या समजुतीतून त्याने हा बनाव रचल्याचे समोर आले आहे.

 

दरम्यान, लग्नाची परिस्थिती पाहता, चांगला व्यावसाय किंवा सरकारी नोकरी असल्यास तात्काळ मुलगी मिळते असाच काही अनुभव तरुणांना आहे. ऋषीकेश ही या फंदात अडकला. त्याने जिद्दीने नोकरी मिळवणे सोडून बनावाने ‘चोर’मार्ग स्विकरला अन् तिथेच तो फसला.

 

चक्क ऋषीकेशने नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत आपण पोलिस झाल्याचा बनाव केला. तोही पुणे पोलिस दलात. त्याने शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या गेटवर उभा राहून तिथे फोटो सेशन देखील केले व नर्हे परिसरात व कुटूंबाला “मी पोलिस झालो” असे म्हणत नर्हेत पेढे वाटले. बॅनरबाजी देखील केली. आता बॅनर अन् पेढे वाटप झाल्यानंतर ही ‘बातमी’ नर्हे पोलिसांना देखील समजली. मग, पोलिस आपल्या भागातलं पोरग पोलिस झाल्याने त्याचा सत्कार करण्यासाठी त्याच्या घरी पोहचले व त्याचे अभिनंदन केले. मात्र, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आणि ऋषीकेशच बिंग फुटलं.

 

अतिउत्साह नडला, गुन्हा दाखल झाला…

कोणताही अधिकृत अधिकार नसताना पोलिस असल्याचं भासवणं आणि महाराष्ट्र पोलिसांच्या चिन्हाचा गैरवापर करणं ऋषिकेशला अंगलट आल. तो सार्वजनिक सेवक नसताना त्याने तसे भासवून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल त्याच्यावर बीएनएस कलम २०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “पोलिस भरती होणं हे सन्मानाचं काम आहे, पण त्यासाठी कष्ट करावे लागतात. अशा प्रकारे खोट्या प्रसिद्धीच्या जोरावर वर्दीचा अपमान करणं चुकीचं आहे,” असं मत नऱ्हे पोलिसांनी व्यक्त केलं आहे.

 

फक्त लग्नासाठी ऋषीकेशचे कांड

ऋषीकेशने हा सर्व प्रकार लग्न व्हाव यासाठीच केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला वाटले की, पोलिस झाल्याची बातमीने आपल्याला मुलगी मिळेल आणि आपले लग्न होईल. त्यासाठी त्याने आईसह सर्वांना खोटे सांगत हा बनाव रचला होता.

 

Local ad 1