...

येवलेवाडी येथे हातभट्टी दारू निर्मिती कारखान्यावर छापा

११.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

 

पुणे, दि. १८ (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहरातील येवलेवाडी परिसरात हातभट्टी दारू निर्मितीसाठी साहित्य तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत ११ लाख २९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. (yeolewadi illegal liquor raid pune)

 

 

30% मालमत्ता कर सवलतीचा मेसेज व्हायरल, पण खरंच आहे का?

 

विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, उंड्री येथील मंतरवाडी–पिसोळी रस्त्यावरून हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उंड्री चौकात सापळा रचून एमएच १६ एई ४९२४ क्रमांकाचा टाटा ४०७ टेम्पो अडवण्यात आला. वाहन चालक बाळू शामराव साळवे याची चौकशी केली असता हे साहित्य सिंहगड कॉलेजसमोरील येवलेवाडी येथील कारखान्यातून आणल्याचे उघड झाले.

 

त्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून लोखंडी बॅरल, अॅल्युमिनियमची भांडी, चूल साहित्य, वाहन व इतर उपकरणे असा एकूण ११.२९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात कारखाना मालक आसिफ उस्मान शेख, कामगार भीमा मोहन वाघेला आणि वाहन चालक बाळू साळवे यांना अटक करण्यात आली आहे.

 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निरीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून तो राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत केला जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Local ad 1