पुणे, कोंढवा परिसरातील प्रभाग क्रमांक 19 मधील अनेक भागांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक काशिफ सय्यद यांनी “वॉटर नॉट टँकर” असा फलक हातात घेऊन महापौरांसमोर थांबत पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले. या आंदोलनात काँग्रेसचे गटनेते चंदू शेठ, नगरसेवक अरविंद शिंदे तसेच इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी परिस्थितीबाबत खुलासा केला. शिवनेरीनगर परिसरातील दूषित पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येणार असून, इतर भागांतील पाणीपुरवठा समस्येवरही आढावा घेऊन लवकर माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नगरसेविका श्वेता घुले यांनी उंड्री परिसरात गेल्या नऊ वर्षांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची गंभीर बाब मांडली. “टँकरवर अवलंबून राहणे नको, आम्हाला पाइपलाइनद्वारे कायमस्वरूपी पाणीपुरवठा हवा,” अशी मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना नंदकुमार जगताप यांनी उंडरी परिसरातील काही पाण्याच्या टाक्यांमध्ये 15 मेपर्यंत पाणी पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. मात्र, नागरिकांना दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

