पुणे : महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली. या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 7 फेब्रुवारी 2026 रोजी निकाल जाहीर केला जाईल. डिसेंबर 2025 मध्ये नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून, पुढील दोन दिवसांत महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागातही निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. (maharashtra zilla parishad panchayat samiti election 2026)
फक्त 12 जिल्हा परिषदांसाठीच निवडणूक
सध्या केवळ 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतील पंचायत समित्यांसाठीच निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांबाबत सुप्रीम कोर्टाचे निर्देश आल्यानंतर पुढील कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर आणि परभणी जिल्हा परिषदेचा समावेश आहे.
मतदार यादी व मतदान प्रक्रिया
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 रोजीची विधानसभा मतदार यादी वापरण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 3 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रचार कालावधी जिल्हा परिषद अधिनियमानुसार मतदानाच्या 24 तास आधी संपेल.
किती मतदार, किती मतदान केंद्र?
12 जिल्हा परिषदांसाठी एकूण 25,482 मतदान केंद्रे आहेत. 2.09 कोटी मतदार त्यापैकी 1.02 कोटी महिला मतदार मतदानासाठी पात्र आहेत. या निवडणुकीत 431 जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले जाणार आहेत.
पंचायत समिती निवडणूक
125 पंचायत समित्यांसाठी एकूण 1,462 सदस्यांची निवडणूक होणार आहे. त्यापैकी 431 जागा महिलांसाठी, 166 जागा अनुसूचित जातींसाठी, 38 जागा अनुसूचित जमातींसाठी, 342 जागा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत.
दुबार मतदारांवर लक्ष
मतदार यादीत संभाव्य दुबार नावे ओळखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संबंधित नावांसमोर (**) असे चिन्ह दिले आहे. मात्र मतदार नावे वाढवणे किंवा कमी करणे आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.

