Nari Shakti bill controversy महापालिकेत जोरदार राडा ! नारी शक्ती विधेयकावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने
Nari Shakti bill controversy पुणे : संसदेत मांडण्यात आलेले नारी शक्ती सन्मान विधेयक नामंजूर झाल्यानंतर त्याचे पडसाद पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सोमवारी झालेल्या सभेच्या सुरुवातीलाच भाजप आणि काँग्रेस नगरसेवक आमने-सामने आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडले होते. मात्र, विरोधकांच्या तीव्र विरोधानंतर ते नामंजूर झाले. याच्या निषेधार्थ भाजपकडून देशभर काँग्रेसविरोधात आंदोलन सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या सभेत भाजप नगरसेविका निवेदिता एकबोटे, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे आणि स्वरदा बापट यांच्या नेतृत्वाखाली महापौर मंजुषा नागपुरे यांच्या आसनासमोर काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“नारी फूल नहीं चिंगारी है” आणि “नारी शक्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो” अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. त्यानंतर भाजपच्या महिला नगरसेवकांचा मोर्चा काँग्रेस गटनेते चंदुशेठ कदम यांच्या आसनाकडे वळला.
अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीत काँग्रेसच्या नगरसेविकांनीही प्रतिउत्तर देत भाजपविरोधात घोषणा दिल्या. यामुळे दोन्ही पक्षांचे नगरसेवक आमने-सामने आले. भाजपच्या समर्थनार्थ इतर पदाधिकारी पुढे आल्याने वातावरण आणखी तापले.
काँग्रेसचे गटनेते चंदुशेठ कदम यांच्यासह अरविंद शिंदे, प्रशांत जगताप आणि इतर नगरसेवकही आक्रमक झाले. परिणामी, सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि कामकाज सुमारे अर्धा तास ठप्प राहिले.

