स्वाभिमानी फाउंडेशनकडून वारकऱ्यांना अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याचे वाटप | पुणे वारी सेवा

 

पुणे :आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर स्वाभिमानी फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पायी वारी करणाऱ्या भाविकांना प्रवासादरम्यान दिलासा मिळावा, या उद्देशाने केळी, बिस्किटे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, राजगिरा लाडू आणि चिप्स यांचे मोफत वाटप करण्यात आले.

 

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो वारकरी हडपसर मार्गे पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण केले. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी फाउंडेशनने पालखी महामार्गावर सेवा केंद्र उभारून वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वितरण केले. वाटप केंद्रावर वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. अनेक वारकऱ्यांनी या सेवाभावी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

 

या उपक्रमात स्वाभिमानी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून वाटपात सहभाग घेतला. त्यांच्यासमवेत फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष शिवानी रोहन सुरवसे पाटील, बंधू अनिल सुरवसे पाटील, आई आशा सुरवसे पाटील, वडील उमेश सुरवसे पाटील आणि तन्वी सुरवसे पाटील यांच्यासह संपूर्ण सुरवसे कुटुंबाने वारकऱ्यांची सेवा केली. स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीने वाटपाची व्यवस्था सांभाळत वारकऱ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.

 

वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करणारा सोहळा आहे. याच भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले. भविष्यातही गरजूंना मदत करणारे आणि समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार स्वाभिमानी फाउंडेशनने व्यक्त केला.

 

Local ad 1