जोगेश्वरी पुनर्विकास प्रकल्पाला गती ; मंत्रा ग्रुपकडून काम सुरू

 

मुंबई, तब्बल १७ वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या मुंबईतील जोगेश्वरी (पूर्व) येथील माजासवाडी सर्वोदयनगर पुनर्विकास प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. प्रकल्पातील शेवटच्या रहिवाशांनी जागा रिकामी करून विकासकाकडे ताबा दिल्यानंतर आता संपूर्ण ९ एकर जागेवर प्रत्यक्ष बांधकाम वेगाने सुरू झाले आहे.

 

या प्रकल्पात एकूण ५७६ म्हाडा सदनिकांचा समावेश आहे. सुरुवातीला अॅक्मे रिअॅल्टीजकडे प्रकल्पाची जबाबदारी होती. कंपनीने ५७६ मूळ रहिवाशांपैकी १७१ कुटुंबांसाठी तीन निवासी इमारतींचे बांधकाम सुरू केले होते. तसेच विक्रीसाठी दोन टॉवर्स उभारून त्यामधील ३५० घरांची विक्रीही करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पासाठी उभारण्यात आलेला निधी आणि आर्थिक अडचणी वाढत गेल्याने कंपनीला प्रकल्प पूर्ण करता आला नाही.

 

हे प्रकरण अखेर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) मध्ये पोहोचले. त्यावेळी कंपनीवर सुमारे ४,३२६.७२ कोटी रुपयांची देणी होती. त्यानंतर एनसीएलटीने मंत्रा ग्रुपचा पुनरुज्जीवन प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावानुसार विक्री झालेल्या दोन टॉवर्समधील ३५० घरखरेदीदारांना घरे पूर्ण करून देणे आणि उर्वरित सुमारे ४०० रहिवाशांसाठी नवीन घरे बांधण्याची जबाबदारी मंत्रा ग्रुपने स्वीकारली.

 

प्रकल्पाला आर्थिक बळ देण्यासाठी ASK Property Fund कडून ३४० कोटी रुपयांची गुंतवणूक ही मिळाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला आता मोठी गती मिळाली असून संपूर्ण जागेवर उत्खनन आणि बांधकामाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

 

मंत्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गुप्ता म्हणाले, “अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराची वाट पाहणाऱ्या शेकडो कुटुंबांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणे आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. आता संपूर्ण जागा ताब्यात आल्याने बांधकाम वेगाने सुरू असून आमची टीम दिवस-रात्र काम करून सर्व वचनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहे.”

 

जोगेश्वरी-विख्रोळी लिंक रोड (JVLR) लगत असलेला हा प्रकल्प मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्रे आणि महत्त्वाच्या वाहतूक मार्गांशी उत्तम प्रकारे जोडलेला असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

 

 

 

 

Local ad 1