पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी ; ३० अटी – शर्तींची कडक नियमावली

पुणे : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ-५ कडून विविध अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. हा कार्यक्रम २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ९.३० या वेळेत आरटीओ चौकातील एसएसपीएमएस कॉलेज मैदानावर होणार आहे. कार्यक्रमाला सुमारे ८ ते १० हजार विद्यार्थी व नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी आयोजकांसमोर तब्बल ३० अटी ठेवल्या आहेत. पोलिसांच्या परवानगीमुळे कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला असला तरी या कठोर अटींमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग करण्यास बंदी, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, चार स्वतंत्र प्रवेशद्वार आणि संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा यांसारख्या अटींवर लक्ष वेधले जात आहे.

 

लाचेची डील २० लाखांवरून ११ लाखांवर ; पैसे घेताच एक्साईज निरीक्षक एसीबीच्या तावडीत  

 

कार्यक्रमस्थळी क्षमतेपेक्षा अधिक नागरिकांना प्रवेश देता येणार नाही. स्टेज व मंडप मान्यताप्राप्त व्यावसायिकांकडून उभारणे, स्टेजच्या सुरक्षिततेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र तसेच अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्यक्रमाशी संबंधित सर्व विभागांच्या आवश्यक परवानग्या आणि NOC घेण्याची जबाबदारी आयोजकांची राहणार आहे. महिला सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, महिला प्रवेशद्वारावर तपासणीसाठी केवळ महिला कर्मचारी किंवा महिला स्वयंसेवकांची नियुक्ती करावी लागणार आहे. महिलांच्या तपासणीसाठी पुरुष स्वयंसेवकांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. VIP आणि आयोजक समितीच्या सदस्यांनाही पासशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

 

ड्रोन शूटिंगला बंदी

कार्यक्रमस्थळी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण किंवा शूटिंग करण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आली आहे. तसेच आकाशाच्या दिशेने हाय-लाईट्स किंवा बीम लाईट्स सोडता येणार नाहीत. ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, ध्वनिप्रदूषण नियम २००० आणि पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

 

वाहतूक व्यवस्थेची ही जबाबदारी

एसएसपीएमएस कॉलेज मैदानाच्या परिसरात पुणे रेल्वे स्टेशन, शाळा-कॉलेज, रुग्णालये आणि शासकीय कार्यालये असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी योग्य पार्किंग व्यवस्था करावी लागणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस, वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाला तातडीने पोहोचता यावे यासाठी स्वतंत्र राखीव मार्ग ठेवावा लागणार आहे.

 

संपूर्ण परिसरात दिवस-रात्र सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे, पुरेशी प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, अग्निरोधक साहित्य आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था करणे बंधनकारक आहे. स्टेजसमोरील ‘डी’ विभागाचे संपूर्ण बॅरिकेडिंग करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

 

कार्यक्रमात आक्षेपार्ह बॅनर, चित्रे किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारांना मनाई करण्यात आली आहे. ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यासही बंदी आहे. एअरपोर्ट अथॉरिटी आणि CISFच्या सुरक्षा अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

 

विशेष म्हणजे, ही परवानगी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र परवानगी मिळाल्यानंतरच अंतिमतः ग्राह्य धरली जाणार आहे. कार्यक्रमस्थळी कोणताही वाद निर्माण झाल्यास किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परवानगी तत्काळ रद्द करण्याचा अधिकार पोलिसांनी राखून ठेवला आहे.

 

 

 

Local ad 1