...

बारामती व राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर ; 23 एप्रिलला मतदान, 4 मे रोजी मतमोजणी

 

मुंबई, दि. 15 : भारत निवडणूक आयोग यांनी देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघ आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामतीचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या असून त्या भरण्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. (baramati rahuri vidhansabha bypoll 2026 voting date)

 

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार संबंधित मतदारसंघांमध्ये मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) तसेच व्होटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) यांचा वापर केला जाणार आहे. मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असणार आहे. त्याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड तसेच आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ही कागदपत्रेही ओळख म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत.

 

दरम्यान, पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच दोन्ही मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि संबंधित राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान किमान तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4 मे 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व प्रशासकीय यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

निवडणूक कार्यक्रम
* 30 मार्च 2026 – राजपत्र अधिसूचना जाहीर
* 6 एप्रिल 2026 – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
* 7 एप्रिल 2026 – अर्जांची छाननी
* 9 एप्रिल 2026 – अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
* 23 एप्रिल 2026 – मतदान
* 4 मे 2026 – मतमोजणी व निकाल जाहीर
* 6 मे 2026 – निवडणूक प्रक्रिया पूर्ण

 

 

 

 

 

Local ad 1