रेल्वेचा निर्णय की अन्याय? : नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरमधील प्रवाशांची होणार मोठी गैरसोय !
नांदेड : येत्या २६ जानेवारीपासून नांदेड–पुणे एक्स्प्रेससह हरंगुळ (लातूर)–पुणे स्पेशलसह मराठवाड्यातून पुण्याकडे येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या पुणे जंक्शनऐवजी हडपसर स्थानकावरच टर्मिनेट करण्याचा निर्णय पुणे विभागाच्या मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. या निर्णयाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून, निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. (marathwada pune train hadapsar termination passenger problem)
व्हिडिओ : बहादूर सुरक्षा रक्षकाची उडी ; खडकवासला धरणात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचले
अमरावती–पुणे गाडी वगळता, विशेषतः मराठवाडा मार्गे पुण्यात येणाऱ्या बहुतांश गाड्या हडपसरपर्यंतच मर्यादित करण्यात आल्या आहेत. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नांदेड–पुणे नियमित एक्स्प्रेस हडपसरहून पुणे जंक्शनपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पुणे विभागाच्या नव्या प्रस्तावानुसार रेल्वे बोर्डाने हा निर्णय पुन्हा मागे घेतला असून, गाडी हडपसरवरच थांबवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून ‘लाईन उपलब्ध नाही, शंटिंगची अडचण’ अशी कारणे दिली जात असली तरी राजस्थान, गुजरात आणि उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्या जेजुरीपर्यंत स्टेबल केल्या जातात, मग मराठवाड्यातील गाड्यांसाठीच अडथळे का, असा सवाल प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे. तळेगाव किंवा खडकी येथे पर्यायी व्यवस्था करता येऊ शकते, असेही संघटनांचे मत आहे.
पहाटे उतरणाऱ्या प्रवाशांचे हाल
नांदेड–पुणे एक्स्प्रेस पहाटे ४.३० वाजता हडपसर स्थानकावर पोहोचते. या वेळेत पुणे महानगरपालिकेची बस सेवा उपलब्ध नसते. खासगी वाहनचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारतात. शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड, मनपा, खराडी याठिकाणी जाण्यासाठी थेट कनेक्टिव्हिटी नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. याचा फटका वृद्ध, महिला, विद्यार्थी आणि रोज पुण्यात नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या मराठवाड्यातील शेकडो प्रवाशांना बसणार आहे.
मराठवाडा प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त गाड्या
नांदेड विभागातून पुणे शहरासाठी दररोज फक्त दोनच गाड्या उपलब्ध आहेत. मराठवाडा हा तुलनेने मागास भाग असल्याने येथील अनेक नागरिक रोजगार व शिक्षणासाठी पुणे व उपनगरांत वास्तव्यास आहेत. त्यामुळे नांदेड–पुणे एक्स्प्रेस आणि हरंगुळ (लातूर)–पुणे स्पेशल या गाड्या मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे प्रवासी संघटनांनी स्पष्ट केले आहे.

