पुणे : पुण्यासह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या निकालांमध्ये पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५-ब मधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी राज्यातील सर्वाधिक मताधिक्याची नोंद करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल २६ हजार ४९७ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. (raghavendra bappu mankar highest vote margin pune municipal election)
पुणे महापालिकेत नवीन चेहऱ्यांचा वर्चस्व ! अनुभव असलेल्या नगरसेवकांची संख्या घटली !
महानगरपालिका निवडणुकांमध्ये यंदा भाजपने राज्यभर जोरदार मुसंडी मारली असून पुणे महानगरपालिकेत भाजपने १२० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक २५ मधील चारही जागांवर भाजपाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी आपल्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा विक्रम केला. प्रभाग क्रमांक २५ मध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी ३१ हजार ९८१ मते त्यांना मिळाली असून, तब्बल ७९.३४ टक्के मतदारांनी त्यांना पसंती दिली आहे.
दरम्यान, पुणे महापालिकेतच प्रभाग ३२-ब मधून भारतभूषण बराटे यांना सुमारे २५ हजारांचे, तर प्रभाग ४-ब मधून रत्नमाला सातव यांना २३ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. मुंबई महापालिकेत निल सोमय्या यांनी १५ हजार मतांच्या फरकाने अव्वल स्थान मिळवले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेत नितीन निकाळजे हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी ठरले आहेत.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना राघवेंद्र बाप्पू मानकर म्हणाले, “माझ्या प्रभागातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उभे केलेले भाजपाचे मजबूत संघटन, पदाधिकाऱ्यांचे अथक परिश्रम, मित्र-परिवाराने प्रचारात केलेले काम आणि नागरिकांसाठी सातत्याने केलेल्या विकासकामांमुळे मला हा मतरूपी आशीर्वाद मिळाला. या विश्वासाबद्दल प्रभागातील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. राज्यातील सर्वाधिक मताधिक्य हा केवळ निकाल नसून, प्रभागाला पुण्यासह राज्यात सर्वाधिक विकसित करण्याचा माझा संकल्प आहे.”

